अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना ताब्यात घेतल्यानंतर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन केले आहे. जर डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना त्यांच्याच देशातून ताब्यात घेऊन अमेरिकेला नेऊ शकतात, तर तुम्हीही मुंबईवर झालेल्या २६/११ हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांना उचलून आणा, असे आवाहन ओवैसी यांनी केले आहे. दहशतवादी मसूद अजहर किंवा लष्कर-ए-तय्यबाच्या म्होरक्यांना भारतात आणा, असे औवेसी यांनी मुंबईतील एका सभेत म्हटले आहे.

व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो व त्यांच्या पत्नी सीलिया फ्लोरेस यांना अमेरिकेच्या डेल्टा फोर्सने शनिवारी पहाटे ताब्यात घेतले. अमेरिकेने मोहीम सुरू असताना व्हेनेझुएलावर हवाई हल्लाही केला होता. या पार्श्वभूमीवर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी २६/११ हल्ल्यातील मुख्य आरोपींना भारतात आणण्याचे आवाहन केले आहे. सौदी अरेबियाने येमेनमधील मुकल्ला बंदरावर UAE च्या जहाजाला लक्ष्य करण्यासाठी हवाई हल्ला केला, त्याचा उल्लेखही ओवैसी यांनी सभेत केला. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ओवैसी यांची मुंबईत सभा झाली.

एमआयएमचे प्रमुख व खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले, “व्हेनेझुएलात ट्रम्प यांनी सैन्य पाठवून तिथल्या राष्ट्राध्यक्षांना त्यांच्याच देशातून उचलून अमेरिकेत नेले. जर ट्रम्प सैन्य पाठवून व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना ताब्यात घेऊ शकतात आणि सौदी अरेबिया हा देश मुकल्ला बंदरावर हवाई हल्ला करू शकतो, तर ज्यांनी मुंबईवर २६/११ हल्ला केला तो मसूद अजहर असो किंवा लष्कर ए तय्यबाचा म्होरक्या, त्यांना पाकिस्तानात सैन्य पाठवून भारतात उचलून आणा. जर ट्रम्प करू शकतात तर तुम्हालाही (पंतप्रधान नरेंद्र मोदी) हे करावे लागेल.” ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्री मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २६/११ हल्ल्यामागील मुख्य सूत्रधारांना भारतात आणण्याचे आवाहन केले आहे.

अमेरिका-व्हेनेझुएलामध्ये वाद कशामुळे?

अमेरिका आणि लॅटिन अमेरिकन देश असलेल्या व्हेनेझुएलाचे संबंध गेल्या अनेक वर्षांपासून ताणले गेले आहेत. व्हेनेझुएलामधून अमेरिकेत मोठी ड्रग्ज तस्करी होत असल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. दुसरीकडे- व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी अमेरिकेचे ड्रग्ज तस्करीचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. यादरम्यान त्यांनी व्हेनेझुएलावर अनेक निर्बंधदेखील लादले आहेत. गेल्या आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाची हवाई हद्द बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर अमेरिकेचे हे पाऊल वसाहतवादी असल्याची टीका व्हेनेझुएलाकडून करण्यात आली होती.