भारतात ‘स्टारलिंक’ची सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक परवाने मिळूनही अंतिम मंजुरी रखडलेली आहे. याच मुद्यांवरून उद्योजक एलॉन मस्क यांनी थेट भारतातील काही प्रभावशाली धनदांडग्यांवर टीका केली. स्टारलिंकला जाणीवपूर्वक रोखून मक्तेदारी टिकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप एलॉन मस्क यांनी केला.
याबाबत मस्क यांनी पोस्ट लिहित काही प्रभावशाली उद्योगपती स्टारलिंकचा मार्ग रोखत असल्याचं म्हटलं. एलॉन मस्क यांच्या या टीकेनंतर भारतानेही प्रत्युत्तर देत सुनावलं. मात्र, आता एलॉन मस्क यांच्या या टीकेला खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी प्रत्युत्तर देत जोरदार टीका केली. ‘आम्ही भारताच्या पंतप्रधानांचा अपमान कसा सहन करायचा? भारताने आपली संसाधने कशी वापरायची हे आम्ही ठरवू, तो गोरा माणूस आम्हाला सांगणार का?’, अशा शब्दांत असदुद्दीन ओवैसी यांनी मस्क यांना सुनावलं. ते एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते.
असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?
भारतात ‘स्टारलिंक’ची सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्याच्या मुद्यांवरून उद्योजक एलॉन मस्क यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर करत केंद्र सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली होती. याच मुद्यावर बोलताना खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी एलॉन मस्क यांच्यावर टीका केली.
“एलॉन मस्क आमच्या पंतप्रधानांबाबत अशा पद्धतीने कसं बोलू शकतात? आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कायम राहू. आमचे १०० टक्के मतभेद असू शकतात. मात्र, आपल्या देशाचा आणि घटनात्मक पदाचा अपमान सहन कसा करायचा? एलॉन मस्क दुसऱ्या कोणालातरी भारताचा पंतप्रधान म्हणत असतील तर आम्ही पंतप्रधानांचा अपमान सहन कसा करणार?”, असं असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं.
“भारताने आपल्या संसाधनांचा वापर कसा करायचा हे स्वतः भारत ठरवेल. हा गोरा माणूस तिथे बसून आम्हाला काय करायचं ते सांगणार का? एलॉन मस्क तिथे बसून बोलत असेल तर त्याविरोधात भाजपावाले गप्प का आहेत? डोनाल्ड ट्रम्प, एलॉन मस्क, शी जिनपिंग यांना भाजपावाले का घाबरतात? भारताने आपली संसाधने कशी वापरायची हे भारत ठरवेल ना, तिथला गोरा माणूस नाही”, अशा शब्दांत असदुद्दीन ओवैसी यांनी टीका केली.
एलॉन मस्क यांनी काय म्हटलं होतं?
भारतीय इंटरनेट बाजारपेठेत मक्तेदारी कायम ठेवण्यासाठी धनदांडग्यांकडून हे अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप एलॉन मस्क यांनी केला होता. “भारतात ज्यांना सध्याचे इंटरनेटचे दर परवडत नाहीत किंवा ज्यांच्याकडे अजिबात इंटरनेट कनेक्शन नाही अशा लोकांसाठी स्टारलिंकमुळे हाय-स्पीड आणि परवडणारे इंटरनेट कनेक्शन उपलब्ध होऊ शकेल. मात्र, धनदांडग्यांना भारतीय सॅटकॉम क्षेत्रातील आपलं वर्चस्व टिकवायचं आहे. त्यामुळे स्टारलिंकला जाणीवपूर्वक रोखून मक्तेदारी टिकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका एलॉन मस्क यांनी केली होती.
केंद्र सरकारने काय स्पष्टीकरण दिलं होतं?
मस्क यांच्या या आरोपांवर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिलं होतं. सॅटेलाइट कम्युनिकेशन सेवांसाठी भारतात निष्पक्ष आणि कोणताही भेदभाव न करणारी नियामक व्यवस्था आहे असं सरकारने म्हटलं होतं. त्यामुळे भारतातील नियामक व्यवस्था कोणत्याही कंपनीला लक्ष्य करत नाही, मस्क यांचे आरोप “निराधार आणि गैरसमजावर आधारित” असल्याचे म्हणत मंत्रालयाने ते फेटाळले होते.
