मुस्लिम समाजाची मतं न मिळूनही भाजप त्यांना न्यायाने आणि सन्मानाने वागवते, या केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या वक्तव्याचा एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी समाचार घेतला आहे. मुस्लिमांना सन्मान आणि न्याय द्यायला तुम्ही कोण लागून गेलात? भारतीय घटनेने आम्हाला तसा अधिकार दिला असून आमच्या हक्कांचे संरक्षण झालेच पाहिजे. रविशंकर प्रसाद हे कायदा मंत्री असल्यामुळे त्यांना या नियमांची अंमलबजावणी करणे भाग आहे, असे ओवैसी यांनी म्हटले.

तर काँग्रेस नेते सलमान खुर्शिद यांनीही रविशंकर प्रसाद यांच्या विधानावर टीका केली. समाजातील एखादा घटकाची मतं आपल्याला मिळणार नाहीत, असे एखाद्या पक्षाला वाटण्यामागचे कारण मला समजत नाही. आपल्याला कोण मतदान करत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामागील कारणांचा शोध घेऊन ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग यामध्ये आदर देण्याचा मुद्दा कुठून आला, असा सवाल खुर्शिद यांनी विचारला.

मुस्लिम समाज भाजपला मतदान करत नाही, याची आम्हाला स्पष्ट कल्पना आहे. मात्र, याचा अर्थ सरकार त्यांना त्रास देते असा होत नाही, असे वक्तव्य केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केले होते. ते शुक्रवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी रविशंकर प्रसाद यांना सरकारचे सध्याचे धोरण देशातील सर्व समाजांना सामावून घेणारे आहे का?, असा प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना रविशंकर प्रसाद यांनी म्हटले की, भारतातील विविधततेचा मी आदर करतो. याकडे बघण्याचे दोन दृष्टीकोन आहेत आणि मी माझी भूमिका स्पष्टपणे सांगू इच्छितो. बऱ्याच काळापासून आमच्याविरुद्ध मोहीम चालवण्यात येत आहे. मात्र, जनतेच्या कृपेने आम्ही सध्या सत्तेत आहोत. सध्याच्या घडीला १५ राज्यांमध्ये भाजपची सत्ता असून १३ ठिकाणी पक्षाचे मुख्यमंत्री आहेत. एकूणच देशभरात आमचे राज्य आहे. मात्र, आम्ही उद्योग किंवा सेवाक्षेत्रातील मुस्लिमांना कधी त्रास दिला आहे का? आम्ही त्यांना एखाद्या पदावरून दूर केले आहे का? आमच्या पक्षाला मुस्लिम मतं मिळत नाहीत, ही बाब मी जाहिरपणे मान्य करतो. मात्र, तरीदेखील आम्ही त्यांना न्यायानंच वागवत आहोत की नाही?, असा प्रतिसवाल रविशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला.