अमेरिकेतील निवडणुकीत मिशिगनमधून डेमोक्रॅटिक पक्षाचे अब्दुल एल-सय्यद विजयी झाल्यानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी उत्तर प्रदेशातील मुस्लिम राजकारणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. “आता मिशिगनमध्ये एक अब्दुल जिंकला आहे, त्यामुळे उत्तर प्रदेशातील ‘अब्दुल’नेही आपली राजकीय ओळख अधिक मजबूत केली पाहिजे,” असे वक्तव्य ओवैसी यांनी बुधवारी केले. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. याबद्दलचे सविस्तर वृत्त डी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
अमेरिकेतील मिशिगनमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे अब्दुल एल-सय्यद विजयी झाले. अमेरिकन सिनेटवर येणारे पहिले मुस्लिम व्यक्ती ठरले. या विजयाचा संदर्भ देत ओवैसी यांनी एक्सवर पोस्ट केली.
“मिशिगनमध्ये एक अब्दुल जिंकला आहे. आता उत्तर प्रदेशातील अब्दुलने आपली राजकीय ओळख मजबूत केली पाहिजे. ‘अब्दुल’ या नावाचा अपमानास्पद उल्लेख करण्याचा प्रयत्न केला गेला. आता अब्दुल कोणासमोरही झुकणार नाही, हे दाखवण्याची वेळ आली आहे. तो केवळ अल्लाहसमोर झुकेल. आता आपण फक्त नमाजासाठी चटई अंथरण्यापुरते मर्यादित राहणार नाही,” अशा आशयाचे विधान ओवैसी यांनी केले.
“मुस्लिमांनी स्वतःचे नेतृत्व उभे करावे”
उत्तर प्रदेशातील अलीकडील सभांमध्येही ओवैसी यांनी मुस्लिमांनी नेहरू-गांधी कुटुंबीय किंवा यादव घराण्यावर राजकीयदृष्ट्या अवलंबून राहू नये, असे आवाहन केले आहे. मुस्लिम समाजातून स्वतःचे नेतृत्व उभे करण्याची गरज असल्याचे ते सातत्याने सांगत आहेत.
गेल्या महिन्याच्या अखेरीस रामपूर येथे झालेल्या सभेत त्यांनी याच मुद्द्यावरून विरोधकांवर टीका केली होती. “त्यांची अडचण ही आहे की त्यांना एखादा अब्दुल नेता झालेला नको आहे. अब्दुलचे काम फक्त नेहरू-गांधी किंवा यादव घराण्यातील नेत्यांसाठी गालिचे अंथरणे आणि त्यावर त्यांनी आराम करणे, एवढेच असावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. पण अब्दुलचा जन्म केवळ गालिचे अंथरण्यासाठी झालेला नाही,” असे ओवैसी म्हणाले होते.
तेलंगणा काँग्रेसकडून ओवैसींच्या भूमिकेवर टीका
ओवैसी यांच्या या वक्तव्यांवर तेलंगणा काँग्रेसने टीका केली होती. हैदराबाद लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे प्रभारी मोहम्मद वलिउल्लाह समीर यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस;शी बोलताना ओवैसी यांच्यावर टीका केली होती. “ओवैसी हैदराबाद किंवा तेलंगणामध्ये स्वतः अंमलात न आणलेले नेतृत्वाचे सूत्र उत्तर प्रदेशात राबवण्याचा प्रयत्न करत आहेत,” अशी टीका त्यांनी केली होती.
उत्तर प्रदेशात ‘एएमआयएमआय’ची राजकीय तयारी
उत्तर प्रदेशात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओवैसी यांनी पक्षाचा प्रचार अधिक तीव्र केला आहे. गेल्या काही महिन्यांत त्यांनी राज्यातील विविध भागांत सभा घेतल्या असून, समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या प्रभावक्षेत्रातही त्यांनी प्रचार केला आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, पक्षातील मुस्लिम आमदार आणि स्थानिक नेतृत्वावर ओवैसी यांनी टीका केली आहे. मुस्लिम समाजाच्या हितांचे संरक्षण करण्यात हे नेतृत्व अपयशी ठरल्याचा आणि मुस्लिम मतदारांकडे केवळ मतपेढी म्हणून पाहिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दुसरीकडे, भाजपाला उत्तर प्रदेशात सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळण्यापासून रोखण्यासाठी विरोधी पक्षांसोबत युती करण्याची तयारीही ओवैसी यांनी दर्शवली आहे. मात्र, अशा युतीमध्ये ‘एएमआयएमआय’ला दुय्यम भूमिका न देता राजकीय भागीदारी म्हणजेच ‘हिस्सेदारी’ मिळाली पाहिजे, अशी त्यांची अट आहे.
