Asaduddin Owaisi On Vande Mataram Bill: राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’शी संबंधित विधेयक (राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक (सुधारणा) विधेयक, २०२६) गुरुवारी लोकसभेत संमत झाले. त्यानंतर विरोधी पक्षांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी हे विधेयक पास होताच याला कडाडून विरोध केला आहे. ओवैसी यांनी देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनाही ते चुकीचे असल्याचे म्हणत १९५० मध्ये त्यांनी सर्वात मोठी चूक केली होती, असे म्हटले आहे. संसदेने गुरुवारी एका विधेयकाअंतर्गत राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’चा अपमान करणे हा आता शिक्षेस पात्र असलेला गुन्हा ठरणार आहे.
वंदे मातरम् मध्ये देवी-देवतांचा उल्लेख – ओवैसी
राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’शी संबंधित विधेयक संसदेत पास झाल्यानंतर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी वृत्तसंस्था ‘एएनआय’शी बोलताना प्रतिक्रिया दिली. “तुम्ही ‘जन गण मन’ म्हणता, तेव्हा तुम्हाला त्यात काय दिसते? तुम्हाला त्यात देश आणि तिथले लोक दिसतात. पण जेव्हा तुम्ही वंदे मातरम् गाता, तेव्हा त्यात देवी-देवतांच्या पूजेचा विषय येतो,” असे ओवैसी म्हणाले.
“आता तुम्ही त्या स्वातंत्र्यसैनिकांविषयी काय सांगाल, ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली? मौलाना महमूद हसन, महमूद हसन देवबंदी, मौलाना अबुल कलाम आझाद, मौलाना काफी. या सर्वांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती”, असे ओवैसी म्हणाले.
राजेंद्र प्रसाद यांनी सर्वात मोठी चूक केली – ओवैसी
देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्याबद्दल बोलताना ओवैसी म्हणाले की, “’जन गण मन’ हे लोकांसाठी लिहिले गेले होते. माझे असे मानणे आहे की, १९५० मध्ये राजेंद्र प्रसाद यांनी एक फार मोठी चूक केली; त्यांनी कोणत्याही औपचारिक ठरावाशिवाय वंदे मातरम् राष्ट्रीय गीत घोषित केले, तर यासाठी एक प्रस्ताव पारित केला जायला हवा होता. राष्ट्रीय गीताची कोणतीही व्याख्या कुठेही देण्यात आलेली नाही. तुम्ही हे अशा प्रकारे देशावर लादत आहात, जे पूर्णपणे चुकीचे आहे.”
अल्लाशिवाय कोणालाही मानत नाही – ओवैसी
“मी एक मुस्लिम आहे आणि मी अल्लाशिवाय कोणाचीही प्रार्थना करत नाही. मी इतर कोणाबद्दल बोललो, तर मी मुसलमानांच्या विरोधात जाईन. सरकार संविधानाच्या कलम २५, २६ आणि २९ चे उल्लंघन करत आहात,” असे ओवैसी म्हणाले.
