Shehbaz Sharif ashamed of begging admission: कर्जबाजारी पाकिस्तान गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. देशातील जनता महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ, पायाभूत सुविधांची कमतरता यात भरडत असताना सरकार मदतीसाठी कधी चीन तर कधी ‘आयएमएफ’कडे हात पसरत आहे. खुद्द पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आता लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्याबरोबर आर्थिक मदत मागण्यासाठी परदेशात गेल्याची कबुली दिली आहे. या हतबलतेची लाज वाटत असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले.
व्यापाऱ्यांशी संवाद
इस्लामाबाद येथे शुक्रवारी (३० जानेवारी) देशातील व्यावसायिकांशी शाहबाज यांनी संवाद साधला. यावेळी शाहबाज यांनी देशाची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असल्याचे मान्य केले. यामुळे काही कठीण निर्णय घ्यावे लागत असल्याचेही त्यांनी सांगितले. देशाचा परकीय चलन साठा जवळपास दुप्पट झाला आहे, परंतु या साठ्यामध्ये मित्र देशांकडून घेतलेल्या कर्जाचा समावेश असल्याचेही त्यांनी नमूद केले. “देशाचा परकीय चलन साठा दुप्पट झालाय पण, यात मित्र देशांकडून घेतलेल्या कर्जाचा समावेश आहे. कर्ज घ्यायला गेलेल्या माणसाचं डोकं झुकलेलं (मान खाली झुकलेली असते) असतं”, असे शाहबाज यावेळी बोलताना म्हणाले.
भीक मागण्याची लाज वाटते – शाहबाज
परदेशात जाऊन आर्थिक मदत मागणे किती शरमेची बाब आहे, याचा उल्लेखदेखील शाहबाज यांनी केला. “लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर आणि मी परदेशात पैशाची भीक मागण्यासाठी जातो तेव्हा लाज वाटते. कर्ज घेणं आत्मसन्मानावर मोठं दडपण असतं. आमची मान शरमेने खाली झुकलेली असते. समोरुन मागणी केल्या जाणाऱ्या अनेक गोष्टींना आम्ही नाही म्हणू शकत नाही”, अशी व्यथा पंतप्रधान शाहबाज यांनी व्यापाऱ्यांसमोर मांडली.
आयएमएफसोबत चर्चा
देशाची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीबरोबर सक्रिय चर्चा करत आहे. यासाठी पाकिस्तान काही कठोर धोरणं लागू करण्याचा विचारही करत आहे. अशा काळात पंतप्रधान शाहबाज यांनी केलेल्या वक्तव्याचे विविध अर्थ लावले जात आहेत. आर्थिक मदत मागण्यासाठी परदेशात फिरल्याने राष्ट्रीय आत्मसन्मानाला धक्का पोहोचतो, असे मत त्यांनी मांडले.
चीन, सौदीचे कौतुक
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज यांनी यावेळी चीनचा ‘चांगला मित्र’ म्हणून उल्लेख केला. देशाच्या कठीण काळात पाठिंबा दिल्याबद्दल सौदी अरेबिया, यूएई आणि कतारचेही त्यांनी आभार मानले. हे देश परकीय चलन साठा स्थिर ठेवण्यास आणि इतर आर्थिक संकट टाळण्यास मदत करतात, असा उल्लेख त्यांनी भाषणात केला.
गरीबी, बेरोजगारीने शिखर गाठले
शरीफ यांनी पाकिस्तानला सतावत असलेल्या मोठ्या चिंता यांचाही यावेळी उल्लेख केला. देशात गरिबी, बेरोजगारी वाढल्याचे त्यांनी मान्य केले. पाकिस्तानमध्ये गरिबीचे प्रमाण सुमारे ४५ टक्के असून, त्यापैकी १६.५ टक्के लोक अत्यंत गरिबीत जगत असल्याचे त्यांनी सांगितले. देशात बेरोजगारीचा दर ७.१ टक्के असून, आठ दशलक्षांहून अधिक लोक बेरोजगार आहेत.
देशावर सार्वजनिक कर्ज ७६,००० अब्ज रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. पाकिस्तान अजूनही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे योजना आणि परदेशी कर्ज यांच्यावर अवलंबून आहे, असे शाहबाज यांनी सांगितले.

