Ashish Shelar : बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, या शुभेच्छा देताना त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना डिवचण्याचा प्रयत्नही केला होता. दरम्यान, भाजपाने आता ममता बॅनर्जी यांना प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाले आशिष शेलार?

“ममता दीदी, तुम्ही जय शाह यांना शुभेच्छा दिल्यात, त्याबद्दल धन्यवाद. जय शाह हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सुपूत्र आहेत. पण त्याबरोबरच त्यांनी स्वत:ला उत्तम प्रशासक म्हणून सिद्ध केलं आहे. मागच्या तीन वर्षात त्यांनी बीसीसीआयच्या प्रशासनात मोठे बदल केलं आहेत”, असं आशिष शेलार म्हणाले. पुढे बोलताना, “मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की, तुमचे पुतणे अभिषेक बॅनर्जीसुद्धा कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही नेते झाले आहेत आणि ते त्यांच्या योग्यतेच्या आधाराव तृणमूल काँग्रेसचे पदाधिकारी आहेत, ज्यांच्यावर मनी लॉंडरिंगचा आरोप आहे”, असं प्रत्युत्तरही त्यांनी ममता बॅनर्जी यांना दिलं.

हेही वाचा – CM Himanta Sarma : “आसामला धमकवण्याची तुमची हिंमत कशी झाली?” ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ विधानवरून मुख्यमंत्री सरमा यांचा हल्लाबोल!

आसामच्या मुख्यमंत्र्यांनाही दिलं प्रत्युत्तर

आशिष शेलार यांच्या व्यतिरिक्त आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही ममता बॅनर्जी यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. “ममता दीदी, आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होते. ते राजकीय नेत्यासारखं पक्षाची धुरा पुतण्याच्या हातात देता येत नाही. आपल्या सगळ्यांना जय शाह यांच्यावर गर्व असायला हवा. केवळ पाच भारतीयांना जागतिक स्तरावर क्रिकेटचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – पश्चिम बंगालमध्ये आंदोलनाने तणाव; डॉक्टर प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; पोलिसासह आंदोलक जखमी

ममता बॅनर्जी यांनी नेमकं काय म्हटलं होतं?

ममता बॅनर्जी यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत जय शाह यांना शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. “गृहमंत्रीजी तुमचं अभिनंदन! तुमचा मुलगा राजकारणी झाला नाही, पण आयसीसीच्या अध्यक्षपदी विराजमान झाला आहे. कदाचित हे पद राजकारण्यांपेक्षा खूप महत्त्वाचे आहे. तुमचा मुलगा खरोखरच खूप ताकदवान बनला आहे, त्यांच्या या सर्वोत्तम कामगिरीबद्दल मी तुमचे अभिनंदन करते”, असं त्या म्हणाल्या होत्या.