scorecardresearch

अशोक गेहलोत रिंगणाबाहेर!; काँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर, दिग्विजय सिंह यांचे आज अर्ज

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची गुरुवारी भेट घेऊन राजस्थानमधील बंडाबाबत माफी मागितली.

अशोक गेहलोत रिंगणाबाहेर!; काँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर, दिग्विजय सिंह यांचे आज अर्ज
अशोक गेहलोत

नवी दिल्ली : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची गुरुवारी भेट घेऊन राजस्थानमधील बंडाबाबत माफी मागितली. ‘‘गेल्या दोन दिवसांतील घडामोडींमुळे मी आता पक्षाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरणार नाही’’, असे गेहलोत यांनी जाहीर केले. त्यामुळे अध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

  गेहलोत पक्षाध्यक्ष होणार नसल्याचे स्पष्ट झाले असले तरी, शशी थरूर यांच्याविरोधात गांधी कुटुंबाचे पाठबळ असलेला उमेदवार म्हणून दिग्विजय सिंह, मुकुल वासनिक की सुशीलकुमार शिंदे याचा उलगडा लवकरच होईल. पक्षाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवारी अखेरचा दिवस असून, ८ ऑक्टोबपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. शशी थरूर आणि दिग्विजय सिंह यांनी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे स्षष्ट केले आहे. शुक्रवारी थरूर आणि दिग्विजय सिंह या दोघांचेच अर्ज दाखल झाले तर, दिग्विजय हेच सोनिया गांधींचे पक्षाध्यक्षपदाचे उमेदवार असतील. पण, या दोघांपेक्षा अधिक गांधी निष्ठावानांनी उमेदवारी अर्ज दाखल केले तर गांधी कुटुंबाचा पाठिंबा नेमका कोणाला हे उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या तारखेलाच स्पष्ट होईल.

राजस्थानमध्ये काँग्रेसच्या आमदारांना न भेटताच परत आलेले मल्लिकार्जुन खरगे आणि अजय माकन यांनी सोनियांना अहवाल सादर केल्यानंतर, काँग्रेसमध्ये भेटीगाठी सुरू होत्या. गेहलोत गुरुवारी रात्री उशिरा दिल्लीत येऊन दाखल झाले होते. सोनियांना भेटण्यापूर्वी गांधी निष्ठावान मुकुल वासनिक यांनी गेहलोत आणि सचिन पायलट यांची भेट घेतली. त्याचवेळी संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी सोनिया यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर, गेहलोत यांनी राजस्थानमधील ‘बंडा’बद्दल सोनियांशी चर्चा केली. ‘‘राजस्थानमध्ये जे झाले, त्याचा सर्वानाच धक्का बसला असून, मी सोनियांची माफी मागितली आहे. एका वाक्याचा ठराव संमत व्हायला हवा होता’’, असे गेहलोत यांनी सोनियांच्या भेटीनंतर पत्रकारांना सांगितले.

सोनिया यांनी अशोक गेहलोत यांना पक्षाध्यक्षपदासाठी पाठिंबा दिला होता. पण, राजस्थानमधील सुमारे ९० गेहलोत समर्थक आमदारांनी सोनियांच्या दुतांना भेटण्यास नकार दिला होता. त्यामुळे ‘राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय सोनियांनी घ्यावा’, हा एका वाक्याचा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही. गेहलोत यांच्या पाठिंब्याशिवाय आमदार पक्षश्रेष्ठींचा आदेश धुडकावण्याचे धाडस करणार नाहीत, हे स्पष्ट झाले. या प्रकारामुळे सोनिया प्रचंड नाराज झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे गांधी कुटुंबाकडून पक्षाध्यक्षपदासाठी नव्या उमेदवाराचा शोध सुरू असल्याची चर्चा रंगली होती. गेहलोत यांनीच पक्षाध्यक्ष होणार नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे नव्या उमेदवारासाठी गांधी निष्ठावानांकडून काय रणनीती आखली जाते, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी गुरुवारी सकाळी काँग्रेस मुख्यालयात येऊन उमेदवारी अर्जाचे संच घेतले. शशी थरूर यांनी याआधीच हे संच घेतले असून, पवन बन्सल यांनी घेतलेले दोन अर्जाचे संच ऐनवेळी गांधी कुटुंबाच्या नव्या उमेदवाराला दिले जाऊ शकतात. झारखंडमधील माजी मंत्र्यानेही उमेदवारी अर्ज घेतल्याचे समजते. उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे समजताच, शशी थरूर यांनी दिग्विजय सिंह यांची भेट घेतली. काँग्रेसमधील लोकशाहीसाठी दिग्विजय यांची उमेदवारी महत्त्वाची असल्याचे थरूर म्हणाले. मात्र, ८ तारखेनंतर निवडणुकीच्या रिंगणात कोण राहील, हे स्पष्ट होईल असे सूचक विधान दिग्विजय सिंह यांनी केल्याने त्यांच्या उमेदवारीबद्दलही शंका घेतली जाऊ लागली आहे.

इंदिरा गांधींच्या काळापासून मी पक्षाचा निष्ठावान सेवक राहिलेलो आहे. पक्षाने माझ्याकडे विश्वासाने केंद्रीय मंत्रीपद, प्रदेशाध्यक्ष, संघटना महासचिव पदांची जबाबदारी दिली. सोनियांमुळे मी तीन वेळा मुख्यमंत्री होऊ शकलो. पण, गेल्या रविवारच्या घटनेमुळे मला मुख्यमंत्रीपदी कायम राहायचे असल्याचे चित्र निर्माण झाले. त्याबद्दल मी सोनियांची माफी मागितली आहे.

-अशोक गेहलोत, मुख्यमंत्री, राजस्थान

मुख्यमंत्रीपदाबाबत दोन दिवसांत निर्णय

  • राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाबाबत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याचे काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल सांनी गुरुवारी स्पष्ट केले.
  • तत्पूर्वी, मी मुख्यमंत्रीपदी राहायचे की नाही याचा निर्णय सोनिया गांधीच घेतील, असे गेहलोत म्हणाले होते.
  • गेले दोन दिवस गेहलोत यांचे विरोधक सचिन पायलट दिल्लीत असून, तेही पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या