Video : “तुम्ही बदलीसाठी पैसे देता?” समोरून आलेल्या उत्तराने मुख्यमंत्रीही झाले हैराण! म्हणाले, “कमाल आहे..”

अशोक गेहलोत यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

rajasthan cm ashok gehlot
अशोक गेहलोत यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भ्रष्टाचार हा विषय नेहमीच राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात चर्चेचा राहिला आहे. या मुद्द्यावरून नेहमीच आरोप-प्रत्यारोप, वाद-विवाद होत असतात. मात्र, अद्याप त्यावर तोडगा सापडू शकलेला नाही. हा भ्रष्टाचार देशात किती खोलवर रुजलेला आहे, याचा प्रत्यय नुकताच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना आला. एका जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने भ्रष्टाचाराविषयी प्रश्न विचारला. पण समोरून आलेलं अनपेक्षित उत्तर ऐकून अशोक गेहलोत स्वत:च हैराण झाले. त्यानंतर गेहलोत यांनी या प्रकारावर ठोस यंत्रणा राबवावी लागल्याची गरज व्यक्त केली. या सगळ्या प्रकाराचा व्हिडीओ सध्या व्हायरल होऊ लागला आहे.

नेमकं झालं काय?

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार कार्यक्रमात सहभागी झाले होते. श्रोत्यांमध्ये बहुतांशी शिक्षकच होते. त्यातही अनेक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा समावेश होता. या प्रेक्षकांसमोर अशोक गेहलोत यांनी राज्यातील इतर मुद्द्यांसोबतच भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला. आणि आपलं बोलून झाल्यावर अपेक्षित उत्तर मिळावं या हेतूने त्यांनी एक प्रश्न श्रोत्यांसमोर उपस्थित केला. पण तिथेच घोळ झाला!

काय होता प्रश्न?

यावेळी बोलताना गेहलोत म्हणाले, “आपण ऐकतो की बऱ्याच वेळा बदली करून घेण्यासाठी पैसे द्यावे लागतात. मला माहीत नाही. तुम्ही मला सांगू शकता का की हे खरं आहे की खोटं?” या प्रश्नावर काहीसा संमिश्र गोंधळ झाला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा विचारलं, “तुम्हाला बदली करून घेण्यासाठी पैसे द्यावे लागतात?” यावेळी मात्र प्रेक्षकांमध्ये पुरेशी एकवाक्यता झाली होती. समोरून एका सुरात उत्तर आलं, “होsss”!

समोरून आलेलं अनपेक्षित उत्तर ऐकून अशोक गेहलोत देखील हैराण झाले. ते म्हणाले, “कमाल आहे!” काही क्षणांची उसंत घेतल्यानंतर अशोक गेहलोत यांनी यावर ठोस अशा धोरणाची गरज व्यक्त केली. “बदलीसाठी पैसे द्यावे लागणं हे दुर्दैवी आहे. बदल्यांसंदर्भातलं धोरणं असं असायला हवं जेणेकरून कुणीही दुखावणार नाही. असं धोरण असायला हवं ज्यात सगळ्यांना हे माहिती असेल की त्यांची बदली नेमकी कधी आणि कुठे होणार आहे. यामुळे कुणालाही पैसे द्यावे लागणार नाहीत किंवा आमदारांकडे खेटे मारावे लागणार नाहीत.”

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ashok gehlot viral video corruption teachers transfer in rajasthan pmw

Next Story
उत्तरप्रदेशात भाजपाच्या सत्तेला हादरा? समाजवादी पार्टी ठरणार कारण; आगामी निवडणुकांचे अंदाज सांगतात…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी