Ashutosh Ranka arrested birthday CJP Ajinkya Shinde : कॉक्रोच जनता पार्टीचे आशुतोष रांका आणि सौरव दास यांना विशेष कार्यकारी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जंतर मंतर येथे परवानगीशिवाय तिरंगा फडकावणे आणि भारत माता की जयच्या घोषणा दिल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. दरम्यान, आशुतोष रांका यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवशीच त्यांना बेकायदेशीररित्या तुरुंगात टाकल्याने सीजेपीचे प्रमुख अजिंक्य शिंदे यांनी सरकारवर टीका केली.
अजिंक्य शिंदे म्हणाले, आशुतोष आणि सौरव दास आणि सीजेपीचे काही नेते आम्ही जंतर मंतरवर गेलो होतो. आम्ही तिथे फक्त तिरंगा फडकवला आणि भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. पण या सरकारने सौरव आणि आशुतोषला तुरुंगात टाकलं आहे. आज आशुतोषचा वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या दिनीच तिरंगा फडकवल्याप्रकरणी त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. माझं देशाच्या जनतेला सांगायचं आहे की या सरकारने स्वतःच्या यंत्रणेचा गैरफायदा घेत या देशातील लोकांचे मुलभूत अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या हुकूमशाही सरकारचा अंत केला पाहिजे.”
अजिंक्य शिंदे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या एका व्हिडिओमध्ये म्हटलंय की, “पूर्वी भारत माता की जय म्हटलं की ब्रिटिश लोक तुरुंगात टाकत असत. मोदी सरकारच्या काळतही तेच सुरू आहे. मोदी सराकरमध्ये हिंमत असेल तर त्यांनी अधिकृतरित्या देशात आणीबाणी जाहीर करावी. ” तसंच, आमची आज बैठक आहे. त्यात पुढील रणनीती ठरवण्यात येईल. या बैठकीत अभिजीत दिपकेही सहभागी होणार आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं.
राहुल गांधींचीही टीका
सौरव आणि आशुतोष यांच्या अटकेवर राहुल गांधी यांनीही टीका केली. राहुल गांधी म्हणाले, “जंतर मंतर येथे शांततेत आंदोलन करताना तिरंगा फडकावणे हा गुन्हा नाही. पण तरुणांना तुरुंगात डांबणं हा भ्याडपणा आहे. तरुण, विद्यार्थी, पत्रकार, इंडिया आघाडी. हे विविध बॅनर असले तरीही त्यांच्या आंदोलनाचं कारण एकच आहे. सर्व आंदोलक एक आहेत. नागरिक त्यांचे मुलभूत अधिकार मागत आहेत. जंतर मंतर हे भारतीय नागरिकांचं आहे. त्यामुळे ते आम्ही परत मिळवूच”, असं राहुल गांधी म्हणाले.
