Asim Munir brain gain claim mocked : पाकिस्तानातील लोक आणि तेथील सरकार नेहमीच वेगवेगळ्या करणांमुळे चर्चेत असते. सध्या पाकिस्तानातून नोकरी किंवा कामाच्या शोधात मजूरच नाही तर देश सोडून जाणाऱ्यांमध्ये उच्चशिक्षितांची संख्याही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. देशातील ढासळलेली आर्थिक स्थिती आणि राजकीय अस्थिरता यामुळे गेल्या दोन वर्षांत हजारो डॉक्टर, इंजिनिअर्स आणि अकाउंटंट्सनी देश सोडला आहे.

पाकिस्तान सरकारच्या एका रिपोर्टमधून याची भीषणता समोर आली आहे. या रिपोर्टनुसार, गेल्या २४ महिन्यांत पाकिस्तानातून ५ हजार डॉक्टर, ११ हजार इंजिनिअर्स आणि १३ हजार अकाउंटंट्स परदेशात निघून गेले आहेत.

दरम्यान यामुळे पाकिस्तानी नागरिक सरकार वर कडाडून टीका करत आहेत. विशेषतः पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची टिंगल उडवली जात आहे. याचे कारण म्हणजे, काही दिवसांपूर्वी असीम मुनीर यांनी लोकांच्या देश सोडून निघून जाण्याला ‘ब्रेन गेन’ असे म्हणत, मोठ्या प्रमाणात होणाऱ्या स्थलांतराला सकारात्मक ठरवण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र समोर आलेल्या आकडेवारीमुळे मुनीर यांच्या दाव्यांमधील फोलपणा समोर आला आहे. पाकिस्तानचे माजी सिनेटर मुस्तफा नवाज खोखर यांनी सरकारचा हा अहवाल समोर आणला आहे. त्यांनी सोशल मीडियावर यातील आकडेवारी पोस्ट करत, “अर्थव्यवस्था सुधारायची असेल तर आधी राजकारण सुधारा!” असे सरकारला बजावले आहे.

“पाकिस्तान हे जगातील चौथे सर्वात मोठे फ्रीलान्सिंग हब देखील आहे आणि इंटरनेट बंदी झाल्यामुळे १.६२ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याने २३.७ लाख फ्रीलान्सिंग नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत,” असेही खोखर त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

पाकिस्तानातील स्थलांतरितांची आकडेवारी काय सांगते?

पाकिस्तान ब्युरो ऑफ एमिग्रेशन अँड ओव्हरसीज एम्प्लॉयमेंटने नुकतेच जारी केलेल्या आकडेवारीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. २०२४ मध्ये ७२७३८१ पाकिस्तानी नागरिकांनी परदेशात रोजगारासाठी नोंदणी केली होती. तर यावर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत ६८७२४६ लोकांनी यासाठी नोंदणी केली आहे. सर्वात चिंतेची बाब म्हणजे, आता फक्त कामगारच नाही, तर उच्चशिक्षितही मोठ्या संख्येने कामाच्या शोधात देश सोडून जात आहेत.

पाकिस्तानातील हेल्थकेअर सेक्टरला या पलायनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. २०११ आणि २०२४ मध्ये पाकिस्तानातून नर्सच्या स्थलांतरात २११४ टक्के इतकी भीषण वाढ झाली आहे. यावर्षीही हे स्थलांतर तसेच सुरू राहिले, असे वृत्त पाकिस्तानच्या एक्सप्रेस ट्रिब्यूनने दिले आहे.

डॉक्टर आणि इंजिनिअर्स मोठ्या संख्येने देश सोडून जात असल्याबाबत आकडेवारी समोर आल्यानंतर पाकिस्तानी नागरिक सोशल मीडियावर सरकारची टिंगल उडवत आहेत. अनेक नेटकऱ्यांनी लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या ऑगस्ट महिन्यातील एका विधानाचा दाखला देत त्यांची खिल्ली उडवली आहे. अमेरिकेत देशाबाहेर राहणाऱ्या लोकांना उद्देशून केलेल्या भाषणात मुनीर यांनी मोठ्या प्रमाणात होत असलेल्या स्थलांतराला ‘ब्रेन ड्रेन’ मानण्यास नकार दिला होता. त्याऐवजी त्यांनी याला ‘ब्रेन गेन’असे म्हटले होते.

मात्र त्यांच्या या विधानामुळे मुनीर हे इंटरनेटवर थट्टेचा विषय बनले आहेत. एका युजरने पोस्ट केली आहे की, “एका मानसिक रुग्णाच्या मते, हे ‘ब्रेन गेन’ आहे.”

दुसऱ्या एका Xayn नावाच्या युजरने पोस्ट केली आहे की, “ते याला ‘ब्रेन गेन’ म्हणत आहेत… या माणसांचे अज्ञान इतके टोकाला गेले आहे की हे देशाला गंभीर संकटाकडे घेऊन जातील, आणि तरी तुम्ही त्यांना याह्या यांच्याप्रमाणे अभिमानाने आणि आत्मविश्वासाने वावरताना पाहाल, जणू काही घडलंच नाहीये.”