US Iran Peace Mediation Pakistan: लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी शिष्टमंडळ बुधवारी इराणमध्ये दाखल झाले. अमेरिका आणि इराण यांच्या शांतता चर्चेसाठी पाकिस्तान मध्यस्थी करत आहे, त्याच प्रयत्नाचा हा एक भाग समजला जातो. मुनीर यांचे शिष्टमंडळ अमेरिकेचा संदेश घेऊनच इराणमध्ये दाखल झाल्याची देखील माहिती समोर आली आहे. यावेळी अमेरिका आणि इराण यांच्यातील पुढच्या चर्चेचा दिवस ठरण्याची शक्यता आहे.

मुनीर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ इराणमध्ये दाखल

असीम मुनीर यांच्याबरोबर पाकिस्तानी मंत्री मोहसीन नख्वी देखील उपस्थित आहेत. इंटर सर्व्हिस पब्लिक रिलेशन (आएसपीआर) च्या माध्यम विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, लष्करप्रमुख मुनीर आणि मंत्री नख्वी यांचे शिष्टमंडळ इराणमध्ये दाखल झाले आहे, अशी माहिती त्यांनी प्रसिद्ध केली आहे. मुनीर यांच्या शिष्टमंडळाचे तेहरान विमानतळावर इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी स्वागत केले. अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेच्या दुसऱ्या फेरीपूर्वी पाकिस्तानच्या तेहरान येथील बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अमेरिकेचा संदेश घेऊन मुनीर दाखल

गेल्या आठवड्यात अमेरिका आणि इराण यांच्यात इस्लामाबाद येथे झालेल्या चर्चेत कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. यानंतर दोन्ही देशांमध्ये होणाऱ्या दुसऱ्या चर्चेकडे जगाचे लक्ष लागले आहे. अशात पाकिस्तानने इराणला दिलेली भेट महत्वाची मानली जात आहे. मुनीर इराणमध्ये अमेरिकेचा संदेश घेऊन दाखल झाल्याचेही सांगितले जात आहे. आता हा संदेश नेमका काय याबाबत माहिती समोर आलेली नाही. पण, अमेरिका आणि इराण यांच्यातील वाटाघाटीतला हा एक महत्वाचा टप्पा मानला जात आहे.

युद्ध जवळपास समाप्तीच्या दिशेने – ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधातील युद्ध जवळपास समाप्त झाल्याचा उल्लेख बुधवारी फॉक्स न्यूज या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. दोन्ही देशांतील वाटाघाटी जवळपास पूर्णत्वास गेल्याचे संकेतही ट्रम्प यांनी या मुलाखतीत दिले. ट्रम्प यांच्या युद्ध समाप्तीच्या वक्तव्यानंतर या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थीची भूमिका बजावणाऱ्या पाकिस्तानचे शिष्टमंडळ आज इराणमध्ये दाखल झाले आहे. त्यामुळे मुनीर यांच्या शिष्टमंडळाची इराणमध्ये नेमकी काय चर्चा होते याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

होर्मुझबाबत ट्रम्प यांची पोस्ट चर्चेत

“मी होर्मुझ सामुद्रधुनी कायमची खुली करतोय यामुळे चीन खूप खूश आहे. हे मी त्यांच्यासाठी आणि संपूर्ण जगासाठी करतोय. ही परिस्थिती पुन्हा उत्पन्न होणार नाही. इराणला शस्त्रपुरवठा करणार नाही यासाठी त्यांनी सहमती दर्शवली आहे. मी काही दिवसांत तिथं (चीनमध्ये) जाईन त्यावेळी अध्यक्ष शी जिंगपिंग मला कडाडून मिठी मारतील. आम्ही फार छान पद्धतीने एकत्र काम करतोय. पण, लक्षात ठेवा गरज पडल्यास आम्ही फायटींगमध्येही चांगले आहोत, इतरांपेक्षा खूप चांगले”, असे ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.