Pakistan Army Chief Asim Munir warns India Over Opertion Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारताकडून मानहानीकारक पराभव पत्करल्यानंतर बरोबर एका वर्षाने पाकिस्तानचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी रविवारी भारताला पुन्हा धमकी दिली आहे. पाकिस्तानविरुद्ध भविष्यात कोणतेही दुःसाहस केल्यास शत्रूला त्याचे अत्यंत व्यापक, धोकादायक, दूरगामी आणि वेदनादायक परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
पाकिस्तानविरोधात दुःसाहस करण्याचा प्रयत्न केल्यास…
पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’ने दिलेल्या वृत्तानुसार, रावळपिंडीतील जनरल हेडक्वार्टरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून बोलताना मुनीर यांनी ही धमकी दिली. यावेळी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल झहीर अहमद बाबर सिद्धू आणि नौदल प्रमुख ॲडमिरल नावेद अश्रफ यांचीही उपस्थिती होती. सभेला संबोधित करताना मुनीर म्हणाले, “आमच्या शत्रूंनी हे लक्षात ठेवावं की, भविष्यात पाकिस्तानविरुद्ध कोणतेही दुःसाहस करण्याचा प्रयत्न केला गेला, तर युद्धाचा प्रभाव मर्यादित राहणार नाही, तर तो अत्यंत व्यापक, धोकादायक, दूरगामी आणि वेदनादायक असेल.”
भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी हा दिवस पाकिस्तान, तेथील जनता आणि सशस्त्र दलांसाठी अभिमानाचा स्रोत असल्याचे म्हटले. मुनीर यांनी असा दावा केला की, ६-७ मे आणि १० मे च्या मध्यरात्री पाकिस्तानचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक सीमांचे उल्लंघन करून शत्रूने आमच्या संकल्पाची परीक्षा घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता, ज्याला पूर्ण राष्ट्रीय एकता आणि लष्करी बळाने उत्तर देण्यात आले. लष्करप्रमुखांनी पुढे असेही म्हटले की, दोन्ही बाजूंमधील हा संघर्ष केवळ दोन देश किंवा सैन्यांमधील पारंपारिक युद्ध नव्हते, तर प्रत्यक्षात ते दोन विचारधारांमधील निर्णायक ‘मार्का’ (युद्ध) होते, यामध्ये अल्लाहच्या कृपेने सत्याचा विजय झाला आणि असत्याचा पराभव झाला.
पाकिस्तानविरोधात भारताने अनेक अयशस्वी प्रयत्न केले
“ते पुढे म्हणाले, “२००१, २००८, २०१६ आणि २०१९ मधील ‘फॉल्स फ्लॅग ऑपरेशन्स’ हा पुरावा आहे की, भूतकाळातही भारताने पाकिस्तानवर बेकायदेशीर युद्ध लादण्याचे आणि आरोप, अतिशयोक्ती, युद्धखोरी आणि मर्यादित आक्रमकतेच्या दिशाभूल करणाऱ्या कल्पनेद्वारे संकुचित, दीर्घकालीन राजकीय आणि लष्करी उद्दिष्टे साध्य करण्याचे अयशस्वी प्रयत्न केले आहेत.” आपल्या इशाऱ्याचा पुनरुच्चार करताना मुनीर यांनी पुन्हा एकदा सांगितले की, जर “पाकिस्तानच्या शत्रूंनी” भविष्यात अशी कोणतीही हालचाल केली, तर युद्धाचे परिणाम मर्यादित राहणार नाहीत.
गेल्या वर्षभरात मुनीर यांनी नवी दिल्लीला दिलेली ही पहिलीच धमकी नाही. गेल्या डिसेंबरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस (CDF) पदी बढती मिळाल्यानंतर त्यांनी भारताला पाकिस्तानच्या युद्धसज्जतेबद्दल कोणताही भ्रम न ठेवण्याचा इशारा दिला होता आणि अधिक जलद, अधिक गंभीर आणि अधिक तीव्र प्रत्युत्तर देण्याचे आश्वासन दिले होते. त्यापुढे जाऊन त्यांनी सिंधू नदीवरील भारतीय पायाभूत सुविधा आणि धरणांना लक्ष्य करण्याची धमकीही दिली होती. ऑगस्टमध्ये अमेरिकेतील अनिवासी पाकिस्तानींच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी कथितपणे म्हटले होतं की, “आम्ही एक अण्वस्त्रधारी राष्ट्र आहोत. जर आम्हाला वाटले की आमचा नाश होत आहे, तर आम्ही अर्ध्या जगाला आमच्यासोबत घेऊन जाऊ.”
काय होते ऑपरेशन सिंदूर?
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू करण्यात आले होते. ७ मे रोजी भारताने रात्रभर केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानव्याप्त जम्मू-काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा आणि ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न केला. परंतु १० मेपर्यंत, म्हणजेच इस्लामाबादने युद्धबंदीसाठी दिल्लीला संपर्क साधण्याच्या एक दिवस आधी, भारताने पाकिस्तानच्या हवाई तळांवर आणि रडार केंद्रांसह लष्करी मालमत्ता आणि पायाभूत सुविधांवर अचूक हल्ले करून पाकिस्तानला गुडघ्यावर आणले होते.
