Asim Munir Donald Trump Phone Call: अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविराम झाल्यानंतर शांतता चर्चेची पहिली फेरी इस्लामाबाद येथे पार पडली. पहिल्या फेरीत काही ठोस तोडगा न निघाल्याने दुसऱ्या फेरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण, दुसऱ्या फेरीआधी दोन्ही देशातील तणाव आणखी वाढल्याचे दिसून आले. अनेक नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेच्या दुसऱ्या फेरीवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. शांतता चर्चेत पाकिस्तान मध्यस्थीची भूमिका बजावत आहे. पाकचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी आता चर्चेसाठी अडचण ठरत असलेल्या नाकेबंदीवरुन थेट डोनाल्ड ट्रम्प यांनाच सल्ला देण्याचे धाडस दाखवले आहे.
मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन
गेल्या आठवड्यात अमेरिका आणि इराणमध्ये चर्चेची दुसरी फेरी होणे अपेक्षित होते. दोन्ही देशात तारीख निश्चित करण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील होते. पण, अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीवरुन दिलेली मुदत समाप्त झाल्यानंतर नाकेबंदीला सुरुवात केली. हीच नाकेबंदी आता पुढच्या चर्चेसाठी अडथळा ठरत असल्याचे मत मुनीर यांनी अमेरिकेला कळवले आहे. लष्करप्रमुख मुनीर यांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संपर्क साधून होर्मुझ सामुद्रधुनीतील नाकेबंदी शांतता चर्चेसाठी अडसर ठरत असल्याचे त्यांंनी सांगितल्याचे वृत्त आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सने प्रसिद्ध केले आहे.
नाकेबंदीचा अडथळा
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, मुनीर यांनी फोनवरुन ट्रम्प यांच्याशी संवाद साधला. दुसऱ्या फेरीसाठी अमेरिकेने होर्मुझमध्ये केलेली नाकेबंदी अडथळा ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. ट्रम्प यांनी यावर विचार करु असे मुनीर यांना सांगितल्याचे वृत्तात म्हटले आहे. इराणने दुसऱ्या चर्चेच्या फेरीत सहभागी न होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर उभय देशातील संघर्ष पुन्हा वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
मुनीर यांची इराण भेट
गेल्या आठवड्यात असीम मुनीर यांनी इराणला भेट दिली होती. तीन दिवसीय भेटीत मुनीर यांनी इराणमधील वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चेला चालना देण्यासह पुढील तारीख निश्चित करण्यासाठी मुनीर यांनी इराण भेट महत्वाची मानली जात होती. दरम्यान, युद्धविरामात इराणच्या जहाजावर हल्ला करुन होर्मुझ पार करताना त्याला ताब्यात घेतल्याप्रकरणी इराणने नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिकेकडून केल्या जाणाऱ्या मागण्या अवाजवी असल्याचे मत देखील इराणने नोंदवले आहे.
