Asim Munir On US-Israel-Iran War : अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू होऊन तब्बल १५ दिवस उलटले आहेत. मात्र, अद्यापही हे युद्ध थांबलेलं नाहीये. अमेरिका-इस्रायल आणि इराण हे एकमेकांवर जोरदार हल्ले करत आहेत. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे इराण देखील आणखी आक्रमकपणे प्रतिहल्ले करत आहे.

दरम्यान, अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर पाकिस्तानात देखील मोठे पडसाद उमटले होते. पाकिस्तानच्या कराचीमधील अमेरिकन दूतावासावर काही जमावाने संतप्त होत सुरक्षा व्यवस्था भेदून आतमध्ये प्रवेश करत दगड आणि काठ्यांनी तोडफोड करत हिंसाचार केला होता. या हिंसाचारात ८ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती.

या घडामोडींच्या अनुषंगाने आता पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी पाकिस्तानी नागरिकांना मोठा इशारा दिला आहे. ‘दुसऱ्या देशात घडलेल्या घटनांच्या आधारावर पाकिस्तानात होणारा हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही’, असा इशारा असीम मुनीर यांनी रावळपिंडीतील एका कार्यक्रमात बोलताना दिला आहे. या संदर्भातील वृत्त पाकिस्तानी माध्यमांच्या हवाल्याने न्यूज १८ ने दिलं आहे.

इराणधील युद्धाचे पाकिस्तानात पडसाद

अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूचे पडसाद थेट पाकिस्तानात उमटले होते. कराचीमधील अमेरिकन दूतावासावर जमावाने हल्ला केला होता. खामेनी यांच्या मृत्यूमुळे शिया समुदाय आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. या अनुषंगाने कराची येथील अमेरिकन दूतावासावर काही जमावाने संतप्त होत सुरक्षा व्यवस्था भेदून दगड आणि काठ्यांनी तोडफोड केली होती. अमेरिकन दूतावासाच्या कार्यालयाच्या काचा फोडत इमारतीला आग लावण्यात आली होती. या घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

इराण-युद्धामुळे पाकिस्तानातील सरकारी कर्मचाऱ्यांवर वाईट वेळ

अमेरिका आणि इराण युद्धाचा पाकिस्तानलाही मोठा फटका बसला. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सरकारी मालकीचे उद्योग आणि स्वायत्त संस्थांमधील कर्मचार्‍यांच्या पगारात ५ ते ३० टक्क्यांपर्यंत कपात करण्यास मंजुरी दिली. सध्या सुरू असलेल्या इंधन संकटामुळे निर्माण झालेली आर्थिक परिस्थितीला तोंड देण्यासाठी आणि खर्चात कपात करण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला. “सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणेच, सरकारी मालकीचे उद्योग आणि सरकारचे नियंत्रण असेलेल्या स्वायत्त संस्थांमधील कर्मचार्‍यांच्या पगारात ५ ते ३० टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आल्याच्या निर्णयामुळे पाकिस्तानातील सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसला आहे.