उत्तर प्रदेशातील अलिगढ मुस्लीम विद्यापीठात घडलेल्या एका प्रकारामुळे सध्या खळबळ उडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केल्याने विद्यापीठाने पीएचडीची डिग्री परत मागितल्याचा दावा एका विद्यार्थ्याने केला आहे. दानिश रहीम असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी या विद्यार्थ्याने केली आहे.

दानिशला अलिगढ मुस्लीम विद्यापीठाने पीएचडीची डिग्री दिली होती. आता ही डिग्री परत मागितली जात आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी दानिशने केली आहे. दानिशने या प्रकरणी दोन्ही नेत्यांना पत्रं लिहिली आहेत. यासंदर्भात द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार, दानिशने सांगितलं, “मला ९ मार्च २०२१ रोजी डिग्री देण्यात आली होती. तर माझी सहकारी मारिया नईमला नोव्हेंबर २०२० मध्ये पीएडीची डिग्री देण्यात आली होती. पीएचडी मिळून सहा महिने उलटल्यानंतर आम्हाला विद्यापीठाने ४ ऑगस्ट २०२१ रोजी एक पत्र पाठवलं. त्यात आम्हा दोघांना चुकून पदवी देण्यात आल्याचं म्हटलं आहे.

दानिश पुढे म्हणाला, “मला हे पत्र आल्यानंतर खूप आश्चर्य वाटलं आणि धक्काही बसला. मात्र, २२ डिसेंबर २०२० रोजी पंतप्रधानांचं कौतुक केल्याचं माझ्या लक्षात आलं. पंतप्रधानांनी अलिगढ विद्यापीठाच्या कार्यक्रमाला संबोधित केलं होतं. तेव्हा मी त्यांचं कौतुक केलं होतं. माध्यमांनी माझी मुलाखतही दाखवली होती”.

ताज्या अपडेट्ससाठी येथे क्लिक करा.

“मी पंतप्रधानांची स्तुती केल्यानंतर मला विद्यापीठाकडून चुकीची वागणूक दिली जाऊ लागली. ८ फेब्रुवारी रोजी माझी परीक्षा(Viva) होती. त्यापूर्वी मला चेअरमननी बोलवून घेतलं होतं. तू विद्यार्थी आहेस. कोणत्याही राजकीय पक्षाच्या बाबत तू अशी उघडपणे भूमिका मांडणं योग्य नाही. राईट विंगचा माणूस असल्या सारखंच तू त्या दिवशी बोलत होतास, असं चेअरमन मला म्हणाले होते”, असं त्याने सांगितलं.

दानिशने यासंदर्भात विद्यापीठाला पत्रंही दिलं आहे. मात्र त्यावर कोणतंही उत्तर आलं नसून त्यावर काही कार्यवाहीही झाली नाही. त्यामुळे आपण नाईलाजाने पंतप्रधान आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिल्याचं त्याने सांगितलं.

विद्यापीठाने दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

दानिशने केलेले आरोप चुकीचे आहेत. त्याला चुकीच्या विषयातली पदवी देण्यात आल्यामुळे त्याला डिग्री बदलण्यास सांगितलं आहे, असं विद्यापाठीचे प्रवक्ता शैफी किडवे यांनी सांगितलं आहे.