मुघल शासक औरंगजेब धर्मांधतेसाठी ओळखला जात असताना, आसाममधील ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे आमदार अमिनुल इस्लाम यांचा दावा वेगळाच आहे. इतिहासापेक्षा वेगळा दावा करत अमिनुल इस्लाम यांनी म्हटले आहे की, औरंगजेबाने अनेक मंदिरांसाठी जमीन दान केली होती. या मंदिरांमध्ये गुवाहाटीचे प्रसिद्ध कामाख्या देवी मंदिराचा ही समावेश होता. मुघल सम्राट औरंगजेबाने गुवाहाटी येथील प्रसिद्ध शक्तीपीठ कामाख्या मंदिरासाठी जमीन दान केल्याचा दावा करून एआययूडीएफ आमदाराने वाद निर्माण केला आहे.

मंगळवारी एनएनआयशी बोलताना अमीनुल इस्लाम म्हणाले, ‘मुघल राजवटीत देशाने जे पाहिले तेच मी सांगत आहे. एका इतिहासकाराने आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, औरंगजेबाने अनेक मंदिरांसाठी जमीन दान केली होती.

अमिनुल इस्लाम म्हणाले की, इतर मुघल शासकांनीही मंदिरे आणि पुजाऱ्यांसाठी जमीन दान केली होती. यातील एक कामाख्या मंदिर आहे. एआययूडीएफचे आमदार अमिनुल इस्लाम म्हणाले की, “हजारो वर्षांपासून धर्मनिरपेक्षतेची भावना देशात आहे. १९४७ पासून ते सुरू झालेले नाही. मुख्यमंत्री म्हणाले होते की भारत १९४७ पासून धर्मनिरपेक्ष आहे. याला उत्तर देताना मी म्हटले आहे की, ज्यांनी भारतावर राज्य केले त्यांनी धर्मनिरपेक्षता पाळली आहे. हिंदू राज्यकर्त्यांच्या काळात मुस्लिम वर्गातील लोक त्यांच्या श्रद्धेसाठी मोकळे होते आणि तशीच परिस्थिती मुस्लिम राज्यकर्त्यांच्या काळातही होती.”

अमिनुल इस्लाम म्हणाले की, भारत हजारो वर्षांपासून धर्मनिरपेक्ष आहे. अमिनुल इस्लामच्या पवित्र आसाम या पुस्तकानुसार औरंगजेबाच्या दरबारातील एका अधिकाऱ्याने जमिनी दान करण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या दाव्यावर आक्षेप घेणाऱ्यांबाबत ते म्हणाले की, मला धमकावण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी हे पुस्तक प्रकाशित करणाऱ्या आसाम साहित्य सभेला धमकावायला हवे. हजारो राज्यकर्त्यांच्या काळात धर्मनिरपेक्षता आली आहे, मग तो कोणताही धर्म असो. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरच देशात धर्मनिरपेक्षता आली आणि मुस्लिम ३०० वर्षांपूर्वी देशात आल्याचा आसामच्या मुख्यमंत्र्यांचा दावा पूर्णपणे चुकीचा आहे.

एआययूडीएफ आमदाराच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा म्हणाले की त्यांच्या सरकारच्या काळात अशी विधाने खपवून घेतली जाणार नाहीत.

“आमदार शर्मन अली आता तुरुंगात आहेत. त्याने पुन्हा असे वक्तव्य केल्यास अमिनुल इस्लामलाही तुरुंगात जावे लागेल. माझ्या सरकारच्या काळात आपली सभ्यता आणि संस्कृतीविरुद्ध वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत. जर त्यांना बाहेर राहायचे असेल तर ते अर्थशास्त्रावर बोलू शकतात आणि आपल्यावर टीका करू शकतात. कामाख्या, शंकरदेव, बुद्ध, महावीर जैन आणि प्रेषित मोहम्मद यांना यामध्ये कोणी ओढू नये,” शर्मा यांनी म्हटले आहे.