Assam Election Result 2026: सर्व देशाचे लक्ष लागलेल्या आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपा हॅटट्रिकच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. निकालाच्या सुरुवातीच्या कलांनुसार भारतीय जनता पार्टी ८२ जागांवर आघाडीवर आहे. विधानसभेच्या १२६ जागांसाठी बहुमतासाठी ६४ जागांची आवश्यकता आहे. सुरुवातीचे कल पाहता भाजपा स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल करत असून, हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार स्थापन होईल असा एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आलेला अंदाज खरा होताना दिसत आहे.
अशी आहे सध्याची आकडेवारी
निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, भारतीय जनता पार्टी ८२ जागांवर आघाडीवर असून, काँग्रेसने १९ जागी आघाडी घेतली आहे. बोडोलँड पीपल्स फ्रंट १० जागांवर पुढे आहे तर, आसा गण परिषद पक्षाचे १० उमेदवार आघाडीवर आहेत. याशिवाय एआययुडीए ०२ आणि रायजोर दर (एरजेआरडी) ०२ जागी आघाडीवर आहे.

(ही आकडेवारी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर रात्री ८.३० वाजता प्रसिद्ध करण्यात आलेली असून, यात बदल होऊ शकतो)
प्रमुख नेत्यांची काय आहे स्थिती?
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, आसाममधील जलुकबारी विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा ४,९७९ मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसच्या उमेदवार बिदिशा निओग १,०१० मतांनी पिछाडीवर असून दुसऱ्या स्थानावर आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देबब्रता सैकिया, अखिल गोगोई, लुरिंज्योती गोगोई, जगदीश भुईयान आणि राजेन गोहेन आपापल्या मतदारसंघात पिछाडीवर होते.
युती आणि प्रमुख मुद्दे
या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने आसाम गण परिषद (एजीपी) आणि यूपीपीएलसोबत युती करून निवडणूक लढवली आहे. तर काँग्रेसने एआययूडीएफसह इतर पक्षांसोबत युती केली आहे. आसामच्या निवडणुकीत विविध महत्वाचे मुद्दे गाजले. प्रचारादरम्यान, बांगलादेशी घुसखोरी, एनआरसी, सीएए, पूर, बेरोजगारी, चहाच्या मळ्यांतील कामगारांचे प्रश्न आणि विकास हे प्रमुख मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी राज्यात सभा घेतल्या होत्या.

एक्झिट पोलमध्ये एनडीएला आघाडी
या वर्षीच्या आसाम विधानसभा निवडणुकीत मतदारांनी उत्सफूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात मतदान केले. एक्झिट पोलनुसार एनडीएला स्पष्ट आघाडी मिळेल असा दावा करण्यात आला आहे. पण, अनेक जागांवर अत्यंत अटीतटीच्या लढती असल्याने अखेरच्या क्षणी चित्र पालटू शकते असाही दावा केला जात आहे. काँग्रेस आघाडीनेही दमदार कामगिरी केल्याचा दावा केला असून, निकाल जाहीर होण्यापूर्वी राजकीय हालचालींना वेग आला आहे.
