आसाम हे एकेकाळी काँग्रेसचे हक्काचे राज्य होते. मात्र गेल्या १० वर्षांत भाजपने या राज्यावरील आपली पकड घट्ट केली आहे. २०११ च्या विधानसभा निवडणुकीत केवळ पाच जागा जिंकणार्या भाजपने २०१६ आणि २०२१ च्या निवडणुकीत ६० पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. आधी सर्बानंद सोनोवाल आणि आता हिमंता बिस्वा सर्मा यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाताशी धरून राज्य केले.
भाजपच्या ‘संकल्पचित्र’ या जाहीरनाम्यात घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’विरोधात कडक कायदे, समान नागरी कायदा तीन महिन्यांत लागू अशा प्रकारची आश्वासने दिली आहेत. भाजप नेते बांगलादेशी घुसखोरीचा आणि आसामच्या अस्मितेचा मुद्दा प्रचारात सातत्याने वापरत आहेत.
मुख्यमंत्री सर्मा यांनी अनेक प्रचारसभांमध्ये मियाँ (बांगलादेशी मुस्लीम) यांना हाकलून द्यावे, असे उघडपणे सांगितले, तर केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनीही मतपेढीच्या राजकारणासाठी बेकायदा स्थायिकांना प्रोत्साहन दिल्याबद्दल पूर्वीच्या काँग्रेस सरकारला जबाबदार धरले.
अस्मितेचे राजकारण आणि स्थलांतरविरोधी मुद्द्यांवरील तीव्र वक्तव्यांमुळे आसाममधील अल्पसंख्याक समुदायाच्या टीकेला सामोरे जावे लागल्याने गेल्या चार दिवसांपासून भाजपने लक्ष घुसखोर आणि अस्मितेच्या राजकारणावरून हटवून युवा सक्षमीकरण आणि पूर निवारणाकडे वळवले आहे. युवककल्याण, महिला प्रश्न, रोजगार आदी मुद्दे काही दिवसांपासून प्रचारात महत्त्वाचे म्हणून घेतले जात आहेत.
काँग्रेसला प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई यांच्या नेतृत्वाखाली १० वर्षांनंतर राज्यात पुनरागमन करण्याची आशा आहे. काँग्रेसने राज्यातील लहानसहान पक्षांना बरोबर घेऊन रणनीती आखली आहे. भाजपने गेल्या दशकभरात सामाजिक सलोखा बिघडवला असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत काँग्रेसने भाजपविरोधात मोहीम आखत मुख्यमंत्री हिमांता सरमा यांना लक्ष्य केले आहे.
प्रमुख उमेदवार
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा, लोकसभेतील विरोधी पक्ष उपनेते गौरव गोगोई, रायजोर दलाचे नेते अखिल गोगोई आणि आसाम विधानसभेतील विरोधी पक्षनेते देबब्रता सैकिया, भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेले काँग्रेस खासदार प्रद्युत बोरदोलोई, भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या नंदिता गारेलोसा, पाच वेळा आमदार असलेले हितेंद्रनाथ गोस्वामी, आसाम जातीय परिषदेचे अध्यक्ष लुरिंज्योती गोगोई.
- एकूण जागा : १२६
- बहुमतासाठी : ६४
- एकूण मतदार : २,४९,५८,१३९
- एकूण उमेदवार : ७२२
