scorecardresearch

मुस्लीम पुरुषांच्या एकापेक्षा जास्त पत्नी असल्यास…; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

स्वतंत्र भारतात राहणाऱ्या कोणत्याही पुरुषाला तीन ते चार महिलांशी लग्न करण्याचा हक्क नाही; हेमंत सरमा यांनी मांडलं स्पष्ट मत

मुस्लीम पुरुषांच्या एकापेक्षा जास्त पत्नी असल्यास…; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान
हेमंत सरमा यांनी मांडलं स्पष्ट मत

मुस्लीम समाजातील पुरुषांच्या एकापेक्षा जास्त पत्नी असण्याला भाजपाचा विरोध असल्याचं आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी म्हटलं आहे. हेमंत बिस्वा सरमा यांनी लोकसभा खासदार बदरुद्धीन अजमल यांना लक्ष्य करत म्हटलं की, AIUDF च्या प्रमुखांच्या सल्ल्यानुसार महिला २० ते २५ बाळांना जन्म देऊ शकतात. पण त्यांचं अन्न, कपडे आणि शिक्षणावरील खर्च विरोधी नेत्यांनी करावा असं त्याचं मत आहे.

“स्वतंत्र भारतात राहणाऱ्या कोणत्याही पुरुषाला तीन ते चार महिलांशी लग्न (पत्नीला घटस्फोट न देता) करण्याचा हक्क नाही. आम्हाला ही पद्धत बदलायची आहे. मुस्लीम महिलांना न्याय देण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल,” असं हेमंत बिस्वा सरमा यांनी कार्यक्रमात भाषण करताना सांगितलं.

“आम्हाला ‘सबका साथ, सबका विकास’ हवं आहे. जर आसामी हिंदू कुटुंबात डॉक्टर असतील, तर मुस्लीम कुटुंबांमधून डॉक्टर असले पाहिजेत. अनेक आमदार असे सल्ले देत नाहीत, कारण त्यांना ‘पोमुवा मुस्लिमांकडून’ फक्त मतं हवी असतात,” अशी टीका त्यांनी केली. पूर्व बंगाल किंवा सध्याच्या बांगलादेशातून आलेल्या बंगाली भाषिक मुस्लिमांना आसाममध्ये ‘पोमुवा मुस्लिम’ म्हणतात.

अजमल यांनी महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर ते म्हणाले की “आसाममध्ये आपल्याकडे बदरुद्धीन अजमल यांच्यासारखे काही नेते आहेत. त्यांच्या मते महिला एका सुपीक जमिनीप्रमाणे असल्याने त्यांनी लगेच मुलांना जन्म दिला पाहिजे. पण स्त्रीच्या बाळंतपणाच्या प्रक्रियेची तुलना शेतीशी होऊ शकत नाही”.

“मी वारंवार म्हटलं आहे की, आमच्या महिला २० ते २५ बाळांना जन्म देऊ शकतात. पण त्यांचं अन्न, वस्त्र, शिक्षण आणि इतर सर्व खर्च अजमल यांना करावा लागेल. तसं असल्यास आम्हाला काही समस्या नाही. पण जर ते त्या मुलांचा खर्च उचलण्यास तयार नसतील तर उगाच बाळंतपणावर व्याख्यान देऊ नये,” असं मुख्यमंत्री म्हणाले.

आपण जितक्या मुलांचा सांभाळ करु शकतो तितक्याच मुलांना जन्म दिला पाहिजे असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला. त्यांना एक चांगली व्यक्ती बनवण्यासाठी चांगलं अन्न, कपडे आणि शिक्षण देण्याची क्षमता असली पाहिजे असं ते म्हणाले आहेत.

“आमच्या सरकारचं धोरण स्पष्ट आहे. आम्हाला सर्वांचा विकास हवा आहे. मुस्लीम मुलांनीही सर्वसामान्य शाळा, कॉलेजात शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनिअर व्हावं असं आम्हाला वाटतं,” असं हेमंत सरमा म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 09:16 IST

संबंधित बातम्या