scorecardresearch

आसामच्या मुख्यमंत्र्यांकडून अमित शहांचा ‘पंतप्रधान’ उल्लेख

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी एका जाहीर सभेत अमित शहा यांना ‘पंतप्रधान’ आणि नरेंद्र मोदींना ‘गृहमंत्री’ असे अनवधानाने संबोधून त्यांच्या पदांची अदलाबदल केली.

(File Photo)

पीटीआय, गुवाहाटी : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी एका जाहीर सभेत अमित शहा यांना ‘पंतप्रधान’ आणि नरेंद्र मोदींना ‘गृहमंत्री’ असे अनवधानाने संबोधून त्यांच्या पदांची अदलाबदल केली. मात्र, त्यावरून आसाममध्ये राजकीय वादाला तोंड फुटले. भाजपने याबाबत ‘अनवधानाने झालेली मानवी चूक’ असे स्पष्टीकरण दिले. मात्र, शहा यांची प्रतिमा ‘आगामी पंतप्रधान’ म्हणून करण्यासाठी केलेला हा हेतुपुरस्सर प्रयत्न असल्याचा संशय विरोधक व्यक्त करत आहेत.

आसाममध्ये भाजप सरकारचे पहिले वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त येथे मंगळवारी झालेल्या जाहीर सभेत शर्मा बोलत होते. या सभेस गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. बोलण्याच्या ओघात शर्मानी मार्गदर्शक आणि प्रेरक  ‘पंतप्रधान’ अमित शहा आणि प्रिय ‘गृहमंत्री’ नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्याची १५ सेकंदांची चित्रफीत विरोधी पक्षांतर्फे सर्वदूर पाठवली जात असून, त्यात पदांची अदलाबदल करण्यामागचा ‘सुप्त हेतू्’ काय आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.  काँग्रेसने ही चित्रफीत ‘ट्विटर’सारख्या समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केली असून, त्यात विचारले आहे, की जेव्हा सर्बानंद सोनोवाल हे मुख्यमंत्रिपदी होते तेव्हा अनेक प्रसंगी खासदार पल्लब लोचन दास यांनी तत्कालीन मंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांचा मुख्यमंत्री असा जाहीर उल्लेख केला होता. त्यानुसार भाजपने नरेंद्र मोदींऐवजी पुढचे पंतप्रधान बदलण्याचे ठरवले आहे काय? किंवा अमित शहा यांना पंतप्रधान म्हणून समोर आणण्याची मोहीम सुरू केली आहे काय?  असेही काँग्रेसने ‘ट्विटर’द्वारे विचारले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Assam chief minister mentions amit shah prime minister announced meeting political argue ysh

ताज्या बातम्या