शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली असून ४० हून अधिक आमदारांना घेऊन ते आसाममधील गुवाहाटी येथे गेले आहेत. गुवाहाटीतील ब्लू रेडिसन या बड्या हॉटेलमध्ये शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा मुक्काम आहे. संबंधित आमदारांचा पाहुणचार भारतीय जनता पार्टीकडून केला जात असल्याचा आरोप अनेक राजकीय नेत्यांनी केला आहे.

दुसरीकडे, सध्या आसाम राज्यात मोठा पूर आला असून नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. याच मुद्द्यावरून आसाम काँग्रेसचे प्रमुख भूपेन कुमार बोराह यांनी एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं असून लवकरात लवकर गुवाहाटी सोडा, अशी विनंती केली आहे.

त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं की, “मागील काही दिवसांपासून आसाम राज्यात पूरजन्य स्थिती आहे. आतापर्यंत जवळपास १०७ असामी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यातील ६५ जणांचा मृत्यू १४ जूननंतर झाला आहे. तसेच आसाममधील ३५ जिल्ह्यांपैकी ३२ जिल्ह्यातील ५५ लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. पूरजन्य स्थितीमुळे असामी नागरिकांचे हाल सुरू आहेत. असं असताना आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिसवा सरमा हे शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा पाहुणचार करण्यात व्यग्र आहेत.”

हेही वाचा- “शिवसेना सोडून कोणत्याही पक्षात जाणार नाही”, शिंदे गटातील महिला आमदाराचा VIDEO आला समोर

राज्यात अशी वाईट स्थिती असताना, आसाम सरकार लोकांना मदत करण्यात व्यग्र असायला हवं होतं. पण ते तुमचा शाही पाहुणचार करण्यात व्यग्र आहे. परिणामी पुराचा फटका बसलेल्या सर्वसामान्य असामी लोकांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांना अद्याप कोणतीही मदत मिळत नाहीये. हे आसाम राज्याच्या हिताच्या दृष्टीने अयोग्य आणि अस्वीकार्य आहे. त्यामुळे कृपा करा आणि लवकरात लवकर गुवाहाटी सोडा,” अशा आशयाचं पत्र आसाम काँग्रेसचे प्रमुख भूपेन कुमार बोराह यांनी एकनाथ शिंदे यांना लिहिलं आहे.

भूपेन कुमार यांनी संबंधित पत्र हॉटेल ब्लू रेडिसनवर ड्युटीवर असणाऱ्या एका अधिकाऱ्याकडे दिलं आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटी सोडल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. ते गुवाहाटीहून मुंबईला रवाना झाल्याचं वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिलं आहे. पण ते मुंबईला येणार की दिल्लीला जाणार याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे.