Assam Election Himanta Biswa Sarma Astrology: आसाम विधानसभा निवडणुकीसाठी ९ एप्रिल रोजी मतदान पार पडले. ४ मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. भाजपाने विजयाची हॅटट्रिक साधू असा भाजपाचा विश्वास आहे. दुसरीकडे काँग्रेसनेही भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान दिले असून निवडणुकीत चांगलाच जोर लावला. भाजपाने मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली. काँग्रेसमधून आलेले हिमंता बिस्वा सरमा तिसऱ्यांदा सत्ता मिळवून देणार का? आसाम निवडणुकीत कुणाचे पारडे जड आहे? याबद्दल प्रसिद्ध ज्योतिषतज्ज्ञ विक्रम चंदीरामानी यांनी अंदाज वर्तवला आहे.
सरमा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचा मोठा विजय
विक्रम चंदीरामानी म्हणाले की, दशकभराचा विचार केला तर आज आसाममध्ये पूर्णपणे वेगळी परिस्थिती दिसत आहे. एकेकाळी अस्थिर आणि विखुरलेला आसाम आज एकजूट झालेला दिसत असून एकाच नेतृत्वाखाली आलेला दिसत आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे ईशान्य भारतातील एक प्रमुख राजकारणी म्हणून उदयास आले आहेत. ज्योतिषी दृष्टीने पाहायचे झाल्यास सरमा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचा एनडीए गट एक निर्णायक विजय मिळवू शकतो.
भारतीय जनता पक्षाने यंदाच्या निवडणुकीत आसाम गण परिषद आणि बोडो लँड पीपल्स फ्रंट या दोन पक्षांबरोबर युती केली आहे. या युतीचा एनडीएला लाभ होताना दिसत आहे. मजबूत संघटन आणि सरकारच्या कामांची जाहिरात करत सत्तारूढ आघाडी निवडणुकीला सामोरी गेली. मागच्या काही वर्षांमध्ये सरमा सरकारने पायाभूत सुविधांचा विस्तार, कुशल प्रशासन, तळागाळातील लोकांपर्यंत कल्याणकारी योजना पोहोचतील यावर लक्ष केंद्रित केले.
रस्ते, दळणवळणाचे प्रकल्प आणि सार्वजनिक सेवांवर सरमा यांनी लक्ष केंद्रीत केल्यामुळे त्यांच्या प्रशासनाचे ठोस असे काम दिसून आले. तसेच प्रमुख योजनांना समाजाच्या विविध घटकांपर्यंत नेल्यामुळे सर्व स्तरातून त्यांना पाठिंबा मिळू लागला. सरकारचे हे प्रयत्न सामान्यांना भावल्यामुळे विकासाची एक नवी लाटच तयार झाल्याचे चंदीरामानी यांनी म्हटले.
हिमंता बिस्वा सरमा यांची कुंडली काय सांगते?
हिमंता बिस्वा सरमा यांच्या राजकारणातील कामाच्या शैलीतून त्यांचे शक्तीस्थळ दिसून येते. तसेच त्यांच्या कुंडलीतही व्यक्तिमत्त्वाबद्दलची अधिक सखोल माहिती मिळते. मिथुन राशीचा प्रभाव असल्यामुळे त्यांच्यात परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची क्षमता आणि तीक्ष्ण बुद्धी असे गुण जन्मजातच आहेत. अशा कुंडलीचे लोक संवाद साधणे आणि समोरच्या परिस्थितीवर तात्काळ निर्णय घेण्यात तरबेज असतात.
त्यांचा सूर्य आणि बुध मकर राशीत असल्यामुळे त्यांच्या स्वभावात शिस्त, नियोजन आणि दीर्घकालीन विचार करण्याची क्षमता आहे. मकर राशीमुळे ठोस परिणाम साध्य करण्यावर लक्ष केंद्रित राहते. त्यामुळेच राजकीय विचार प्रभावीपणे प्रशासकीय कामात रूपांतरित करू शकतात.
याबरोबरच कर्क राशीतील चंद्र जनतेबरोबरचे एक भावनिक नाते निर्माण करतो. लोकांबद्दलच्या प्रश्नांची उत्तम जाण आणि त्याबद्दलची संवेदनशीलता यातून दिसते. ही जाण फक्त शासनापुरती मर्यादित नाही. ग्रहांची ही स्थिती नेत्यांना नेहमीच जनतेची नाडी ओळखून भविष्यातील बदलांचा अंदाज घेण्यास मदत करते. त्यातून राजकीय नेते बदलत्या परिस्थतीशी जुळवून घेतात.
नेपच्यून आणि शुक्र यांचा अनुकूल संबंध व्यक्तिमत्वात एक सूक्ष्म पण महत्त्वाचा गुण जोडतो. यामुळे एखाद्या व्यक्तीला अशी प्रतिमा तयार करता येते जी लोकांशी एकरुप होऊन त्यांच्याशी भावनिक नाते तयार करते.
सरमा यांच्या व्यक्तिमत्वाची रचना त्यांच्या राजकीय प्रवासाशी जुळणारी आहे. त्यांचा उदय सरळ आणि साधा नव्हता. त्यांनी योग्य वेळी घेतलेले निर्णय आणि बदलांमुळे त्यांची प्रगती झाली. त्यांची व्यापक ग्रह दशाही या प्रगतीकडे इशारा करतात. त्यांची शुक्रची महादशा जी ऑक्टोबर २००८ मध्ये सुरू झाली, ती २०२८ पर्यंत कायम असणार आहे. हा कालावधी करिअरमध्ये वाढ आणि प्रसिद्धीसाठी अनुकूल मानला जातो. महत्त्वाचे म्हणजे ही दशा सुरू होताच, ते राज्यमंत्री पासून कॅबिनेट मंत्री बनले. तिथून त्यांचा राजकीय आलेख चढता राहिला.
मे २०२१ मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले. तेव्हा त्यांच्यावर गुरू ग्रहाचा प्रभाव होता. गुरूचा काळ साधारणपणे पदोन्नती, अधिकार आणि जबाबदाऱ्या वाढविणारा मानला जातो. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावर त्यांची निवड होणे, हे गुरूच्या गुणधर्मांशी जुळणारे आहे.
सध्या ते शुक्रच्या महादशेत आणि बुधच्या अंतर्दशेत आहेत. बुधचा प्रभाव व्यक्तीला अधिक सक्रिय आणि धोरणात्मक बनवतो. जे व्यक्ती पटकन विचार करू शकतात, परिस्थितीनुसार बदल करू शकतात आणि व्यक्त होण्यावर नियंत्रण ठेवू शकतात, त्यांच्यासाठी हा काळ खूप फायदेशीर ठरतो. हे सर्व गुण हिमंता बिस्वा सरमा यांच्या कामातून स्पष्ट दिसत आहेत.
आसाममधील विरोधी पक्षाचे नेतृत्व काँग्रेसकडे आहे. काँग्रेसने ‘आसाम संमिलित मोर्चा’ या ८ पक्षांच्या युतीच्या माध्यमातून भाजपाला तगडे आव्हान दिले. गौरव गोगोई आणि बदरुद्दीन अजमल हे नेते काँग्रेसच्या नेतृत्वासाठी प्रमुख भूमिका निभावत आहेत. काँग्रेसने आपल्या आघाडीत आसाम जातीय परिषद आणि राईजोर दल यांसारख्या प्रादेशिक पक्षांसह ‘ऑल पार्टी हिल लीडर्स कॉन्फरन्स’, ‘सीपीआय-एम’ आणि ‘सीपीआय-एमएल’ यांना सोबत घेतले आहे. या आघाडीच्या माध्यमातून भाजपाच्या संघटनात्मक शक्तीला उत्तर देण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला.
