गुवाहाटी : ईशान्य भारतातील महत्त्वपूर्ण राज्य असलेल्या आसाममध्ये तिसर्यांदा भाजपने विजय मिळवला. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या ‘सुरक्षा आणि विकास’ या अजेंड्याला आसामी जनतेने मोठा पाठिंबा दिला असून त्यामुळे भाजपची निवडणुकीत सरशी झाली. निवडणुकीच्या प्रचारात भाजपने बांगलादेशी घुसखोरीचा आणि हिंदुत्ववादी अस्मितेचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला होता.
घुसखोरांविरोधात कठोर कारवाई, ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’विरोधात कडक कायदे, समान नागरी कायदा तीन महिन्यांत लागू अशी आश्वासने दिली. या मुद्द्यांना निवडणुकीत यश आले. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने १२६ सदस्यीय विधानसभेत १०२ जागांवर विजय मिळवला आणि बहुमताचा आकडाही ओलांडला.
निकालामध्ये धार्मिक ध्रुवीकरण दिसून आले. भाजपने आदिवासी, शहरी पट्ट्यांमध्ये एकहाती विजय मिळवला असला तरी मुस्लीम मते काँग्रेस आणि बद्रुद्दीन अजमल यांच्या ‘एआययूडीएफ’सारख्या इतर पक्षांमध्ये विभागली गेली. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी जलुकबारी मतदारसंघातून १,२७,१५० मते मिळवून काँग्रेस प्रतिस्पध्र्याचा ८९,४३४ मतांनी पराभव केला.
काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार्यांना यश
काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले प्रद्युत बोरदोलोई यांनी प्रतिष्ठित दिसपूर मतदारसंघातून ४९,६६७ मतांनी विजय मिळवला. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा यांच्यासह कमलाख्या डे पूरकायस्थ, शशिकांत दास या काँग्रेमधून भाजपमध्ये आलेल्या उमेदवारांनीही विजय मिळवला.
आसाम सरकारच्या कामांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासावर दिलेला भर याचे प्रतिबिंब निकालात उमटले. गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यूचे राजकारण केल्याबद्दल जनतेने काँग्रेसला शिक्षा दिली आहे. जोपर्यंत सूर्य आणि चंद्र अस्तित्वात आहेत, तोपर्यंत भारत एक हिंदू राष्ट्र राहील. – हिमंता बिस्वा सरमा, मुख्यमंत्री
हिंदुत्ववादी भूमिकेमुळे सरमा चर्चेत
* भाजपचा कट्टर हिंदुत्ववादी चेहरा अशी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची ओळख. २०१५ पासून आसाम आणि ईशान्येकडील इतर राज्यांमध्ये भाजपचा प्रभाव वाढवण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
* २००१ पासून सलग सहा विधानसभा निवडणुकांमध्ये सरमा विजयी झाले. २०१५मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपची भगवी शाल खांद्यावर घेतली आणि २०१६च्या निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळवून दिले. * सरमा यांच्या कामाची दखल घेत २०२१मध्ये त्यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. मुख्यमंत्री असतानाही त्यांनी हिंदुत्ववादाचा मुद्दा हाताशी धरून राज्य केले. मदरशांवर निर्बंध, विधानसभेत नमाज पढण्याची मुभा बंद, आसाम मुस्लीम विवाह विधेयक संमत, बांगलादेशी घुसखोरांवर मोठ्या प्रमाणात कारवाई अशा अनेक निर्णयांमुळे देशभरात त्यांना प्रसिद्धी मिळाली आहे.
