पीटीआय, गुवाहाटी : आसाममध्ये पडत असलेल्या संततधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. सुमारे ४० हजार जण पूरग्रस्त असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पूरग्रस्त जिल्ह्यांतील मदत-निवारा छावण्यांमध्ये अनेक पूरग्रस्तांनी आश्रय घेतला आहे. सोमवारपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे गेल्या २४ तासांत चार जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला आहे. आठ महसूल मंडलांतील सुमारे ५० पेक्षा जास्त गाव-खेडय़ांचा यात समावेश आहे. धेमाजी, लखिपूर आणि दिब्रुगढ जिल्ह्यांतील जनजीवन संततधारेमुळे विस्कळीत झाले आहे. दिमा हसो जिल्ह्यात जितगा नदीला अचानक आलेल्या पुराचा अनेक भागांना फटका बसला आहे. जितगा नदीला अचानक आलेल्या पुरामुळे दगड वाहून नेणारा एक ट्रक अडकला. त्याचा वाहक आणि सहायकाने सुरक्षितस्थळी पलायन केल्याने त्यांना धोका उद्भवला नाही.

बोंगाईगाव, धेमाजी, दिब्रुगड, मोरीगाव आणि सोनितपूर जिल्ह्यांत जमिनीची मोठी धूप झाली आहे. जिल्हा प्रशासन आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाची पथके पूरबाधितांना सुरक्षितस्थळी हलवत आहेत. केंद्रीय जल आयोगाने दिलेल्या माहितीनुसार ब्रह्मपुत्र नदी जोरहाटमधील नेमाती घाट येथे धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेल्या अंदाजानुसार आसाम व मेघालयात बहुतांश ठिकाणी दिवसभरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे.  गडगडाट, विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी वृष्टी होईल. गुरुवार ते शनिवारपर्यंत राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.