आसाम सरकारने अल-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप असणाऱ्या मदरशांवर कारवाईचं सत्र सुरूच ठेवलं आहे. बुधवारी (३१ ऑगस्ट) बंगाईगाव जिल्ह्यातील आणखी एका मदरसा पाडत कारवाई करण्यात आली. या मदरशातील एका शिक्षकाला अल-कायदाशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आसाममध्ये मागील महिनाभरात अशी कारवाई झालेला हा तिसरा मदरसा आहे.

पोलिसांनी हा मदरसा दहशतवादी कृतींसाठी अल-कायदाचा अड्डा म्हणून वापरल्याचा आरोप केलाय. यानंतर जिल्हा प्रशासनाने आठ बुलडोझरच्या मदतीने हा मदरसा पाडला. शुक्रवारी (२६ ऑगस्ट) पोलिसांनी मुफ्ती हाफिजूर हरमान नावाच्या शिक्षकाला अल-कायदाचा सदस्य असल्याच्या आरोपाखाली अटक केली होती.

व्हिडीओ पाहा :

यानंतर मंगळवारी (३० ऑगस्ट) पोलिसांनी या मदरशावर छापा टाकला. या छाप्यात अनेक प्रकारचं आक्षेपार्ह साहित्य सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं. आरोपी शिक्षक मुफ्ती रहमान २०१८ मध्ये या मदरशात शिक्षक म्हणून रुजू झाला होता.

हेही वाचा : विश्लेषण : अल कायदाचा नवा प्रमुख कोण असणार? त्याची निवड कशी होणार?

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने मंगळवारी मदरसा पाडण्याचे आदेश दिले. मदरसा परिसरात सुरू असलेल्या विविध कृती करण्याची परवानगी या संस्थेकडे नसल्याचा ठपका ठेवण्यात आला. तसेच या इमारतीत आपत्ती निर्माण झाल्यास त्यासाठीच्या सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याचाही ठपका ठेवण्यात आला. या मदरशातील जवळपास २०० विद्यार्थ्यांना या ठिकाणाहून दुसरीकडे हलवण्यात आलं आहे.

या कारवाईचा एआययूडीएफचे प्रमुख मौलाना बद्रूद्दीन अजमल यांनी विरोध केलाय. कुणी दोषी आढळला असेल तर त्या व्यक्तीवर कारवाई केली पाहिजे. संस्थेवर कारवाई करणं चुकीचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.