Assam News: आसाममधून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. १५ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली असून, घरच्यांना ओळखू येऊ नये अशा पद्धतीने तिचे शरीर विद्रूप करण्यात आले आहे. कुटुंबीय नातेवाईकांच्या घरुन माघारी आल्यानंतर १५ वर्षीय मुलीचा मृतदेह राहत्या घरात आढळून आला. हैलाकंदी जिल्ह्यात ही घटना घडली. पीडितेवर बलात्कार झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

पीडितेवर बलात्कार झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप

एनडीटीव्हीने पोलिसांच्या हवाल्याने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, पीडित तरुणीचे डोकं आणि चेहरा जबरदस्त प्रहार करुन विद्रूप करण्यात आला आहे. तसेच, तिच्या गुप्तांगात रॉड आढळून आला आहे. पीडितेवर अमानुष अत्याचार केल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे. १५ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

स्नेहभोजनासाठी गेले होते नातेवाईकांच्या घरी

उत्तरीय तपासणीनंतर १५ वर्षीय पीडितेवर लैंगिक अत्याचार झाला आहे का? तसेच, पीडितेच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, असे म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. नातेवाईंकांच्या घरी स्नेहभोजनासाठी कुटुंबीयांसोबत पीडित मुलगी देखील गेली होती. पण, तिथं भावंडांसोबत झालेल्या वादानंतर ती आपल्या घरी माघारी परतली होती, असे एनडीटव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

पोलिस काय म्हणाले?

दरम्यान, जेवण उरकून पीडितेचे कुटुंबीय घरी माघारी परतल्यानंतर पीडितेचा मृतदेह घरात जमिनीवर आढळून आला. पीडितेच्या शरिराचे विद्रुपीकरण करण्यात आले होते. या घटना समोर आल्यानंतर आक्रमक स्थानिकांनी रस्त्यावर उतरत राष्ट्रीय महामार्ग रोखला व दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. वरिष्ठ पोलिस अधीक्षक अमिताभ सिन्हा यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिली आहे. याप्रकरणी पाच संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. लैंगिक अत्याचाराबाबतचे आरोप अद्याप निश्चित झाले असून, त्याबाबत तपास सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

शवविच्छेदन अहवालातून माहिती येणार समोर

“कुटुंबीयांनी पीडितेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला आहे. पण, कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी आम्ही शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करत आहोत. आम्ही या प्रकरणाचा सखोल तपास करत आहोत. चौकशीसाठी सध्या चार जणांना ताब्यात घेतलं आहे”, असे वरिष्ठ पोलिस अधीक्षक अमिताभ सिन्हा यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.