आसाम दुसरे जम्मू -काश्मीर बनू शकते, असा आरोप आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी रविवारी केला आहे. तसेच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आसाममधल्या हिंदूंना एका विशिष्ट समुदायाच्या लोकांच्या आक्रमणापासून वाचवण्याची विनंती केली आहे. सरमा यांनी काल आसामच्या सिलचर येथील आरएसएस मुख्यालयाला भेट दिली. मुख्यालयात बंद दाराआड झालेल्या बैठकीला संबोधित करताना “आसाम दुसरं काश्मीर बनणार आहे,” असं त्यांनी म्हटलंय.

“लोकांच्या आक्रमकतेमुळे इथले लोक मोठ्या धोक्यात आहेत. तसेच चहाच्या पट्ट्यात आणि राज्याच्या दूरच्या सीमावर्ती भागात राहणारे हिंदू देखील एका विशिष्ट समुदायाच्या मोठ्या प्रमाणात आक्रमणामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.” आसामच्या मुख्यमंत्र्यांनी या धोक्यापासून वाचवण्यासाठी आरएसएसला राज्यातील इतर भागांमध्ये जाऊन हिंदूंना एकत्र करण्याचे आवाहन केले. आरएसएस ही तळागाळातील संघटना आहे आणि दुर्गम भागातील सामान्य लोकांशी त्यांचे मजबूत संबंध आहे, त्यामुळे तेच हिंदूंना वाचवण्याचं काम करू शकतात, असं मत सरमा यांनी मांडलं.

त्यानंतर सीएए आणि एनआरसी कायद्यांबद्दल बोलताना सरमा म्हणाले, राज्यातील काही ठरावीक लोक या दोन्ही कायद्यांचे कट्टर विरोधक आहेत, हे खरंय. मात्र आता गोष्टी बदलू लागल्या आहेत. हे दोन्ही कायदे आसाम आणि आसामी लोकांच्या हिताच्या विरोधात नाहीत, हे आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच नुकत्याच भेटलेल्या काही बुद्धिजीवी लोकांनी मला म्हटलं की बंगाली हिंदू आसामी समाजासाठी धोका नाही. मात्र, आसामच्या लोकांना आता वस्तुस्थिती समजली आहे,” असंही सरमा म्हणाले.