Election 2026 Voter Turnout: आसाम, केरळ आणि पुदुच्चेरीमधील आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पाडले. गुरुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार मतदारांनी मतदानाला जोरदार प्रतिसाद दिली. भारतीय निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, पुदुच्चेरीमध्ये सर्वाधिक ८९.८३ टक्के मतदान झाले, त्याखालोखाल आसाममध्ये ८५.३८ टक्के, तर केरळमध्ये ७८.०३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
आसाममध्ये ८५.३८ टक्के मतदानाची नोंद
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, आसाममधील सर्व १२६ विधानसभा मतदारसंघांमध्ये सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे ८५.३८ टक्के मतदान झाले आहे. २०२१ च्या निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या तुलनेत यावेळी तीन टक्के मतदानात वाढ झाली आहे. २०२१ च्या निवडणुकीत ८२.०४ टक्के मचतदानाची नोंद झाली होती. राज्यात अत्यंत चुरशीची लढत होत असून, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येण्याचा प्रयत्नात आहे, तर काँग्रेस दशकानंतर पुन्हा इथं सत्ता मिळवण्याचे ध्येय बाळगून आहे.
केरळमध्ये ७८.०३ टक्के मतदान
तसेच, केरळमध्ये विधानसभेच्या १४० जागांसाठीचे मतदान सायंकाळी ६ वाजता पार पाडले. सहा वाजेपर्यंतही अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मतदानाच्या अंतिम वेळेपर्यंत मतदान केंद्रांवर उपस्थित असलेल्यांना टोकन देऊन मतदान करण्याची परवानगी देण्यात आली. राज्यात यावेळी ७८.०३ टक्के मतदान झाले असून, २०२१ च्या विधानसभा निवडणुकीतील ७४.०६ टक्के मतदानापेक्षा किंचित जास्त आहे.
पुदुच्चेरीत ८९.८३ टक्के मतदान
पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात ३० विधानसभा मतदारसंघांसाठीचे मतदानही सायंकाळी ६ वाजेपर्यंत ८९.८३ टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली. याठिकाणी सत्ता टिकवून ठेवण्याचे एनडीएचे लक्ष्य आहे.
पोटनिवडणुकीत किती टक्के मतदान झाले?
आजच्याच दिवशी कर्नाटक, त्रिपुरा आणि नागालँडमध्ये पोटनिवडणूक पार पडली. कर्नाटकमधील बागलकोट येथे ६८.७० टक्के, दवानागरे दक्षिणमध्ये ६८.५५ टक्के तसेच, नागालँडमधील कोरिडांग येथे ८२.२१ टक्के आणि त्रिपुरातील धर्मानगरमध्ये ८०.०४ टक्के मतदान झाल्याची आकडेवारी भारतीय निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे.
