Guwahati Wife Murder Case accused died: पत्नीचा शिरच्छेद करत तिचे शीर फ्रिजमध्ये ठेवणाऱ्या आसाममधील गुवाहटीच्या विकृत रामानुज गोस्वामीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. वैद्यकीय तपासणीसाठी त्याला गुवाहाटी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नेले जात असताना त्याने पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी नरकासूर टेकडीवरून पडल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. इंडिया टुडेने सदर वृत्त दिले असून रुग्णालयातील डॉक्टरांनी रामानुजचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली.

३ सप्टेंबर रोजी रामानुज गोस्वामीने त्याची २५ वर्षीय पत्नी रिया तालुकदारचा निर्घृण खून केला होता. तिचे शीर छाटून फ्रिजमध्ये ठेवले होते, तर मृतदेह घरातच पडलेला होता. शेजाऱ्यांना दुर्गंधी येऊ लागल्यानंतर सदर प्रकरण उजेडात आले होते. ६ सप्टेंबर रोजी त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

शुगर डॅडीला मारण्याची दिली होती धमकी

८ सप्टेंबर रोजी रामानुजला वैद्यकीय तपासणीसाठी नेले जात असताना त्याने माध्यमांना ओरडून सांगितले की, त्याला या कृत्याचा कोणताही पश्चाताप नाही. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तिच्या शुगर डॅडीलाही संपवेन, अशी धमकी त्याने दिली होती.

“मी माझ्या पत्नीला ठार केले, त्याचा मला मुळीच पश्चाताप नाही. मी कुणाचीही माफी मागणार नाही. मी माझ्या पत्नीला ठार केले. आता तिचा शुगर डॅडीही वाचणार नाही. मी तुरुंगातून शिक्षा भोगून आल्यानंतर तिच्या शुगर डॅडीला ठार करेन असे रामानुजने म्हटले होते”, असे रामानुज म्हणाला होता.

प्रकरण काय आहे?

रिया आणि रामानुज यांचे लग्न सहा महिन्यांपूर्वी झाले होते. शेजाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, जोडप्यामध्ये वारंवार वाद होत असत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या फ्लॅटमधून मोठा आवाज ऐकू आला त्यानंतर एका महिलेच्या रडण्याचा आवाज येत होता. त्यानंतर रियाचा खून झाल्याची बातमी समोर आली. रियाच्या चारित्र्यावर संशय घेत असल्यामुळे दोघांमध्ये वारंवार खटके उडत असत.

रिया एका बुटीकमध्ये काम करत होती. तिच्या आई-वडिलांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला असून तिच्या पश्चात एक लहान भाऊ आहे. तर रामानुज हा उबेर चालक म्हणून काम करत होता. या प्रकरणाशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले की, रामानुजला अमली पदार्थांचे सेवन करण्याचे व्यसन होते. गुवाहाटीबाहेरील एका पुनर्वसन केंद्रात त्याच्यावर अनेक वेळा उपचार करण्यात आले होते.