युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही आणि युवक काँग्रेसचे सचिव वर्धन यादव यांच्यावर आसाम युवक काँग्रेसच्या माजी अध्यक्षा डॉ. अंगकिता दत्ता यांनी छळाचे गंभीर आरोप केले होते. तसेच, यासंदर्भात काँग्रेसच्या वरिष्ठांकडे तक्रार करून अद्याप चौकशी समिती नेमण्यात आली नसल्याचं, अंगकिता दत्तांनी म्हटलं होतं. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत राष्ट्रीय महिला आयोगाने याची दखल घेतली होती.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी आसामच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहित या घटनेच्या सखोल आणि निष्पक्ष चौकशी मागणी केली होती. तसेच, सविस्तर अहवाल सादर करण्याचं निर्देश दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर आसाम पोलीस आज ( २३ एप्रिल ) श्रीनिवास बी.व्ही यांच्या कर्नाटकातील घरी पोहचले होते. पण, श्रीनिवास बी.व्ही नसल्याने त्यांच्या घरावर नोटीस लावण्यात आली आहे. श्रीनिवास यांना २ मे रोजी गुवाहाटीत चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितलं आहे.
याबाबत गुवाहाटीचे पोलीस आयुक्त प्रतीक विजय कुमार यांनी म्हटलं, “दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यानुसार आरोपी मागील ६ महिन्यांपासून पीडितेचा छळ करत आहे. तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यासाठी आम्ही त्यांना नोटीस बजावली आहे. ते गुवाहाटीला आल्यावर त्यांचं मत जाणून घेण्यात येईल. याबद्दल कर्नाटक पोलिसांनाही माहिती देण्यात आली आहे.”
अंगकिता दत्तांची पक्षातून हकालपट्टी
शनिवारी ( २२ एप्रिल ) अंगकिता दत्तांवर काँग्रेस पक्षाने कारवाई केली आहे. अंगकिता दत्तांची ६ वर्षासाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कृत्य केल्याचा ठपका अंगकिता दत्तांवर ठेवण्यात आला आहे.
अंगकिता दत्तांचा काय आहे आरोप?
बुधवारी अंगकिता दत्ता यांनी ट्विट करत श्रीनिवास बी.व्ही आणि वर्धन यादव यांच्यावर छळाचे आरोप केले होते. “मागील सहा महिन्यांपासून युवक काँग्रेस अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही आणि वर्धन यादव माझा छळ करत आहेत. वर्धन यादव यांना महिलेचा सन्मान कसा करायचा हे माहिती नाही. ते मला ‘ये लडकी’ असं म्हणत बोलावतात. ते मला डॉ. अंगकिता दत्ता किंवा आसाम युवक काँग्रेसची अध्यक्ष म्हणून संबोधत नाहीत,” असा आरोप अंगकिता दत्तांनी केला होता.
