कोक्राझार : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह ट्वीटशी संबंधित प्रकरणात गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांना आसाममधील एका न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. मात्र, त्यानंतर मेवानी यांनी अधिकाऱ्यांवर कथित हल्ला केल्याच्या आरोपाखाली आसाम पोलिसांनी त्यांना पुन्हा अटक केली.

लोकसेवकाला कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी स्वेच्छेने इजा करणे, त्याच्यावर हल्ला करणे किंवा गुन्हेगारी स्वरूपाचा बलप्रयोग करणे इत्यादी आरोपांखाली मेवानी यांच्याविरुद्ध भादंविच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वी, मोदींविरुद्धच्या ट्वीटशी संबंधित प्रकरणात कोक्राझारमधील एका न्यायालयाने मेवानी यांना जामीन मंजूर केला. काँग्रेसचा पाठिंबा असलेले आमदार मेवानी यांच्याविरुद्ध कोक्राझार येथे गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर त्यांना १९ एप्रिलला गुजरातमधील पालनपूर येथून अटक करण्यात आली होती व दोन दिवसांनी त्यांना कोक्राझार येथे आणण्यात आले होते.