नवी दिल्ली : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत करण्यात आलेल्या आरोपांशी संबंधित प्रकरणात मंगळवारी आसाम पोलिसांच्या पथकाने दिल्लीतील काँग्रेस नेते पवन खेरा यांच्या निवासस्थानी झडती घेऊन चौकशी केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
आसाम पोलीस उपायुक्त देबोजित नाथ यांनी सांगितले की, “खेरा हे त्यांच्या निवासस्थानी नव्हते. त्यांच्या निवासस्थानी झडतीमध्ये पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत. पोलिसांना काही आक्षेपार्ह साहित्य मिळाले आहे.” खेरा यांचा शोध घेण्यात येईल, असेही नाथ यांनी सांगितले. मुख्यमंत्री सरमा यांच्या पत्नीकडे तीन पारपत्रे आहेत.
याशिवाय त्यांच्या मालमत्तेबद्दलची माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपवण्यात आली असल्याचा आराेप खेरा यांनी केला होता. यावर काँग्रेसने खोटी माहिती दिल्याचा आरोप मुख्यमंत्री सरमा यांनी केला. त्यांनी म्हटले की, पाकिस्तानी समाजमाध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या पत्नीवर बिनबुडाचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी खेरा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त नाथ यांनी सांगितले.
सरमा आक्रमक
खेरा यांनी ज्या कागदपत्रांच्या आधारे आपल्यावर आरोप केले त्याची पडताळणी केली गेली नव्हती असा दावा करून हिमांता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसवर टीका केली. तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे वय झाले असून ते वेड्यासारखे बोलत आहेत, असेही ते म्हणाले. खेरा यांनी केलेल्या आरोपांची केंद्रीय तपास संस्थांमार्फत चौकशी करावी अशी मागणी खरगे यांनी केल्यामुळे सरमा यांनी संताप व्यक्त केला.
