आसाममध्ये एनडीएफबी (एस) या संघटनेने बाकसा जिल्ह्य़ात केलेल्या हिंसाचारात सालबारी येथे गावक ऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनी येऊन भेट दिल्याशिवाय मृतांवर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आहे.
संतप्त निदर्शकांनी ननकेखाद्राबारी भागात  सांगितले, की महिला व मुलांसह एकूण १८ मृतदेह असून मुख्यमंत्री गोगोई आल्याशिवाय व त्यांनी आमच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेचे आश्वासन दिल्याशिवाय या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत. आमच्या जीवाला काही किंमत आहे की नाही, आम्हाला संरक्षण हवे आहे, यापुढे आमच्यावर हल्ले होता कामा नयेत. अंत्यसंस्कार केले नाहीत तर अटक करण्याची धमकी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी या भागात भेट देण्याबाबत तातडीने कुठलीही घोषणा केली नाही. एनडीएफबी-एस च्या बंडखोरांनी शुक्रवारी रात्री बाकसा व कोक्राझार येथे मोठय़ा प्रमाणात हिंसाचार केला त्यात १०० घरे पेटवली, १८ जण येथे ठार झाले तर एकूण मृतांची संख्या ३२ झाली आहे. दरम्यान चिरांग जिल्ह्य़ात बेमुदत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शुक्रवारी ती शिथिल केली होती.
हिंसाचार मोडून काढू – शिंदे
आसाममध्ये हिंसाचारात ३२ जण ठार झाले असून अल्पसंख्याकांविरोधाील हा हिंसाचार मोडून काढला जाईल, असे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले, मृतांमध्ये निरपराध लोकांचा समावेश असून त्यातील ३१ जण अल्पसंख्याक जमातीचे आहेत. एनडीएफबी-एस हा बोडो गट हिंसाचारास जबाबदार असून, सरकार अल्पसंख्याक लोकांना संरक्षण देईल, त्यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या ४३ कंपन्या (४३०० जवान) पाठवल्या आहेत आणखी दहा कंपन्या म्हणजे १००० जवान पाठवण्यात येतील. याशिवाय तेथे १५०० लष्करी जवान तैनात करण्यात आले आहेत.आसाम सरकारने या घटनेची एनआयए चौकशी करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री गोगोई यांनी मारेक ऱ्यांना शोधण्याचे आश्वासनही दिले आहे. आसाममध्ये लोकांनी शांतता पाळावी, आम्ही स्थिती नियंत्रणात आणीत आहोत, असे शिंदे यांनी सांगितले.