आसाममधल्या गुवाहाटीमध्ये श्रद्धा वालकर हत्याकांडसारखीच एक घटना घडली आहे. येथील एका महिलेने तिच्या प्रियकराच्या आणि त्याच्या मित्राच्या साथीने पती आणि सासूची हत्या केली. त्यानंतर या दोघांना हाताशी धरून दोन्ही मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांचे तुकडे केले. हे तुकडे पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये भरून घरातल्या फ्रिजमध्ये ठेवले. त्यानंतर तीन दिवसांनी हे तुकडे आसामच्या शेजारचं राज्य मेघालयमधील टेकड्यांवर फेकून दिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातली आहे.
पोलिसांनी सांगितले की, रविवारी एका महिलेच्या मृतदेहाचे काही तुकडे सापडले होते. गुवाहाटी पोलीस आयुक्त दिगंता बराह यांनी सांगितलं की, ही घटना तब्बल ७ महिन्यांपूर्वीची आहे. याप्रकरणी आम्ही तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांची सध्या चौकशी सुरू आहे. परंतु आयुक्तांनी या घटनेची सविस्तर माहिती देण्यास नकार दिला.
हत्या करून नवरा आणि सासू बेपत्ता असल्याची तक्रार
उपायुक्त दिगांता कुमार चौधरी यांनी सांगितलं की, या महिलेने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात तिचा पती अमरेंद्र डे आणि सासू शंकरी डे हे दोघेजण बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी अमरेंद्र आणि शंकरी यांचा तपास सुरू केला. त्यानंतर काही दिवसांनी अमरेंद्र याच्या काकांनी पोलिसात तक्रार दाखल केली तसेच त्यांनी अमरेंद्र याच्या पत्नीवर संशय असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं. या तक्रारीनंतर पोलिसांनी पुन्हा एकदा पहिल्यापासून घटनेचा तपास सुरू केला, तसेच चौकशी सुरू केली.
हे ही वाचा >> महिला IAS-IPS अधिकाऱ्यांमधला वाद चव्हाट्यावर, आधी खासगी फोटो शेअर केले आता भ्रष्टाचाराचे आरोप
प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या साथीने केली हत्या
चौधरी यांनी देखील या प्रकरणाची सविस्तर माहिती देणं टाळलं. परंतु त्यांनी दावा केला आहे की, अमरेंद्र याच्या पत्नीने तिचा प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या मदतीने हे दोन खून केले आणि मृतदेहांची विल्हेवाट लावली. पोलिसांनी दावा केला आहे की, हे दोन्ही खून वेगवेगळ्या ठिकाणी झाले आहेत. खून करून अमरेंद्र आणि शंकरी यांच्या मृतदेहांचे तुकडे करण्यात आले. हे तुकडे पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये भरून त्यांनी मेघालयमधल्या डोंगरदऱ्यांमध्ये फेकून दिले.