scorecardresearch

नक्षलवाद्यांकडून ख्रिस्ती धर्मोपदेशकाची हत्या

 ‘प्राथमिक माहितीनुसार, संशयित सशस्त्र नक्षलवाद्यांचा एक गट स्थानिक पाद्री यल्लम शंकर यांच्या घरात घुसला आणि त्यांना घराबाहेर ओढून काढले.

प्रतिनिधिक छायाचित्र

बिजापूर : छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी एका ख्रिस्ती धर्मोपदेशकाची पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून हत्या केली. ही घटना मद्देड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंगमपल्लीगुआ खेडय़ात गुरुवारी घडली आणि मृतदेह शुक्रवारी आढळला.

 ‘प्राथमिक माहितीनुसार, संशयित सशस्त्र नक्षलवाद्यांचा एक गट स्थानिक पाद्री यल्लम शंकर यांच्या घरात घुसला आणि त्यांना घराबाहेर ओढून काढले. या लोकांनी त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्रांनी हल्ला करून त्यांना जागीच ठार मारले. या घटनेबाबत माहिती मिळल्यानंतर पोलिसांचे एक पथक शुक्रवारी घटनास्थळी पोहोचले,’ असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. घटनास्थळावरून एक हस्तलिखित पत्र हस्तगत करण्यात आले. त्यात नक्षलवाद्यांच्या मद्देड एरिया कमिटीने या खुनाची जबाबदारी स्वीकारली असून, मृत पाद्री हा पोलिसांचा खबऱ्या असल्याचा आरोप केला आहे.  तथापि, त्याचा पोलिसांशी काही संबंध नव्हता, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

क्रिकेटवरून दोन गटांत संघर्ष, वृद्धाची हत्या

नवसारी : गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील संदलपूर खेडय़ात क्रिकेटचा सामना खेळण्यावरून दोन समुदायांत झालेल्या संघर्षांत एका वृद्धाची हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी सात आरोपींना अटक केली आहे. नवसारीचे पोलीस उपअधीक्षक एस. के. राय यांनी सांगितले की,  शुक्रवारी सायंकाळी दोन्ही समुदायांचे लोक गोळा झाले आणि त्यांनी एकमेकांवर तीक्ष्ण शस्त्रांनी हल्ला केला. या संघर्षांत ६५ वर्षांचा एक वृद्ध मरण पावला. याप्रकरणी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Assassination of a christian pastor by naxalites akp

ताज्या बातम्या