Hyderabad : गेल्या काही दिवसांपासून डॉक्टरांना मारहाणीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. डॉक्टरांना मारहाण आणि रुग्णालयांची तोडफोड हा विषय गंभीर रूप धारण करत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. असे असतानाच आता हैदराबादमध्ये एका रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांनी एका महिला डॉक्टरला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

हैदराबादमधील एका रुग्णालयातील एका रुग्णाच्या नातेवाईकाने एका महिला ज्युनियर डॉक्टरला मारहाण केली. रुग्णाच्या नातेवाईकाने महिला डॉक्टरचा हात धरत मारहाण केली. तसेच कपडे फाडण्याचा प्रयत्नही केला. यानंतर रुग्णालयात असणाऱ्या दुसऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी लगेचच हस्तक्षेप करत त्या महिला डॉक्टरची सुटका केली. या घटनेचा एक व्हिडीओही व्हायरल होत झाला आहे. ११ सप्टेंबर रोजी ही घटना घडल्याची माहिती सांगितली जात आहे.

हेही वाचा : Himachal Pradesh Ragging Video: दारू प्यायला नाही, म्हणून ज्युनिअर विद्यार्थ्याला सीनिअर्सकडून मारहाण; रात्रभर करत होते रॅगिंग!

नेमकी काय घडलं?

व्हायरल व्हिडीओमध्ये असं दिसतं आहे की, महिला ज्युनियर डॉक्टर रुग्णांना तपासत आहे. मात्र. तेवढ्यात एक व्यक्ती अचानक येतो आणि महिला ज्युनियर डॉक्टरला जोरदार मारहाण करताना दिसत आहे. तसेच महिला ज्युनियर डॉक्टरचे कपडे फाडण्याचाही प्रयत्न त्या व्यक्तीने केल्याचं सांगण्यात येत मात्र, त्या ठिकाणी उपस्थित असेल्या दुसऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी लगेचच मारहाण करणाऱ्या व्यक्तीला बाजूला ओढून चोप दिला.

दरम्यान, मारहाण करणारा व्यक्ती रुग्णालयात दाखल झालेल्या एका रुग्णाचा नातेवाईक असल्याचं सांगण्यात आलं. या मारहाणीच्या घटनेनंतर पुढील कारवाईसाठी आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढीत तपास करत आहेत.

काही दिवसांपूर्वी कोलकातामध्ये आर.जी.कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये एका तरुण प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या क्रूर बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर संपूर्ण देशातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. डॉक्टर्स रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. भारतातील आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची खात्री देण्यासाठी कठोर कायदे करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्तेत असतानाच पुन्हा डॉक्टरांना मारहाण होत असल्याच्या धक्कादायक घटना समोर येत असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहेत.