Detailed Assembly Election Analysis 2026 shows a strategic advantage for BJP in West Bengal and Assam : पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम या राज्यांमध्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकींचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यानुसार तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये एका टप्प्यात, तर पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार असून ४ मे रोजी या निवडणुकांचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी दृष्टिकोन या विशेष कार्यक्रमात या राज्यातील राजकीय परिस्थितीचे सविस्तर विश्लेषण केले आहे.
आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी येथे निवडणुका होतील. त्यातील तीन महत्त्वाची राज्य, ज्यांच्याकडे जास्त लक्ष असेल एक आसाम, दुसरं पश्चिम बंगाल, तिसरं तामिळनाडू आणि चौथं हे काँग्रेससाठी जास्त महत्त्वाचं असलेलं केरळ. या पाच पैकी फक्त एका राज्यातच भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे या निवडणुकीला सामोरे जाताना सगळ्यात सुखी आणि निश्चिंत असा कुठला पक्ष असेल तर तो भाजपा. कारण गमवण्यासारखं फारसं काही नाही, जी काही कमाई होईल ती इतकी मोठी आहे असं सादरीकरण त्यांच्याकडून केलं जाईल, की जणू त्यांचा पराजय झाला तर पराजयसुद्धा त्यांचा विजयच वाटावा. मग मताचं प्रमाण किती वाढलं, मतांची टक्केवारी कशी सुधारली, वगैरे सादरीकरण होईल, असे गिरीश कुबेर म्हणाले.
ही निवडणूक भाजपाला जितकी निश्चिंत ठेवणारी आहे, तितकीच ती झोप उडवणारी कोणाची असेल, तर ती काँग्रेसची असू शकेल. एकतर आसामध्ये त्या पक्षाला थोडीशी धाकधूक आहे. त्या पक्षासाठी दुसरा आशेचा मुद्दा आहे तो म्हणजे केरळ. डावी आघाडी आणि काँग्रेसची आघाडी, म्हणजेच एलडीएफ आणी युडीएफ यांच्यामध्येच केरळमध्ये सामना असेल. तामिळनाडूमधे द्रमुकच्या पाठीवर बसून काँग्रेस पुढे गेलेलं आहे. तिथे त्यांना काहीच स्थान नाही. पण तिथे भाजपाला देखील स्थान नसल्याने काँग्रेसला बरं वाटू शकेल. तिथे राष्ट्रीय म्हणवून घेणाऱ्या या दोन पक्षांना फारसं काही स्थान नाहीये, असेही गिरीश कुबेर यांनी स्पष्ट केले. .
आसाममध्ये काय स्थिती?
आसामध्ये हिमंत बिस्व सरमा…मराठीमध्ये एक म्हण आहे की, धर्मांतरीत झालेला जास्त कडवा असतो. खरंतर अर्धा डझन पक्षांचा अनुभव असलेले हे हिमंत बिस्व सरमा हे मूळच्या भाजपावासीय हिंदुत्ववाद्यांपेक्षा अधिक हिंदुत्ववादी निघालेले आहेत. सरमा हिंदुत्वाच्या लढाईत प्राणपणाने उतरलेले आहेत. आपणच हिंदुत्वाचे तारणहार अशी त्यांची मांडणी सुरू आहे. यांच्या हिंदुत्ववादी आवाजावरून लक्षात येणार नाही पण हे मुळात आसाम गण परिषदेमध्ये होते. आसामच्या निवडणुकीत मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांना आव्हानं देणारे काँग्रेसचे तरूण गोगोई यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळातही ते मुख्यमंत्री होते. त्यामुळे गेली १२-१३ वर्ष त्यांचा हा सत्तापदाचा काळ अखंड सुरू आहे. तो आता सुरू राहिल की नाही हे या निवडणुकीत सिद्ध होईल. गंमत अशी आहे की, त्यांना परत मुख्यमंत्री पदी निवडून येणं हे भाजपामधील सुद्धा अनेकांना आवडेल असेलच असे नाही. कारण ते राष्ट्रीय नेत्याच्या स्तरावर जाऊन बसतील. मग शिवराज सिंह चौहान सलग विधानसभा जिंकून देणारे नेते म्हणून जेव्हा पुढे आले तेव्हा त्यांचं काय झालं हे आपण पाहिलं. पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका आहेत. योगी आदित्यनाथ यांनी सलग तिसरी विधानसभेची खेप जिंकून दाखवली तर काय होईल, तर काय होईल या कल्पनेने पोटात गोळा येईल असे नेते भाजपामध्ये नाहीत असं नाही. त्यामुळे हिमंत बिस्व सरमा यांच्यासाठी ही निवडणूक आतल्या बाजूनेपण संघर्षाची आहे आणि बाहेरच्या बाजूनेदेखील संघर्षाची आहे, असे गिरीश कुबेर म्हणाले.
पश्चिम बंगालमध्ये २०११ पासून ममता बॅनर्जी सलग सत्तेवर आहेत. ही निवडणूक त्या जिंकल्या तर ही चौथी खेप ठरेल, एका अर्थाने तो विक्रमच म्हणता येईल. एकेकाळी पश्चिम बंगालमध्ये मार्क्सवादी पक्ष अजरामर असल्यासारखा वाटत होता, त्याला दूर करून ममता बॅनर्जी सत्तेत आल्या आहेत. काँग्रेसला त्यांनी त्या राज्यातून हद्दपार केल्यासारखी स्थिती आहे. ती जागा भाजपाने घेतली आहे. पश्चिम बंगालमध्ये बंगाली परंपरा ही दुर्गा देवीची आहे. पण भाजपाने गेल्यावेळेला अधिक-अधिक धर्माच्या आधारे ही निवडणूक कशी लढवता येईल यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे. मदतीला निवडणूक आयोग, उच्च न्यायालयात काम करणारे, न्यायाधीश पदाचा झगा उतरवून थेट राजकारणात उडी घेणारे, ज्येष्ठ विधिज्ञ अशांपासून सगळे भाजपाच्या दिमतीला आहेत. त्यामुळे भाजपासाठी ही लढाई एका अर्थाने असमतोल आहे. फक्त यातली अडचण अशी आहे की, भाजपाच्या अरेला तितक्याच ताकतीने कारे म्हणण्याची क्षमता देशभरात ज्या काही दोन-चार नेत्यांमध्ये आहे, त्यामध्ये एक ममता बॅनर्जी आहेत. त्यामळे त्यांनीही त्याच पद्धतीने भाजपाला उत्तरं देण्यास सुरूवात केल्याने भाजपाची कोंडी झाली आहे असे गिरीश कुबेर म्हणाले.
निवडणूक कशाच्या आधारे लढली जाईल?
भाजपाच्या एका बाजूला धार्मिक मुद्दे, धार्मिक ध्रूवीकरण.. हा आता भाजपाचा आवडता उद्योग झालेला आहे. हुकमी एक्का तर आहेच आहे. त्याच वेळेला, त्याच मुद्द्यावर भाजपाशी तशाच भाषेत बोलताना पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी खेळली आहे ती लक्षात घेणं गरजेचं आहे. ती खेळी अर्थातचं लोकानुनय करणाऱ्या योजना जाहीर करण्याची, आपल्याकडे जसे लाडक्या बहिणींनी भाजपाला आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारला हात दिला, तसेच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी बेरोजगार युवकांसाठी एक योजना आखली, दर महिन्याला त्यांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होतील अशी योजना आखली. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत १८ ते २४ या वयोगटातील मतदारांचं प्राधान्यक्रमाने मोठं वजन असल्याने त्यांना जिंकण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जींनी केला आहे. त्यांनी विविध योजनांची खैरात केलेली आहे, असे गिरीश कुबेर म्हणाले.
एका बाजूला पंतप्रधान सांगत असतात की रेवड्या वाटू नका, रेवड्या शेवटी नुकसानीत जाणारा खेळ आहे. त्याचवेळेला सर्व राज्य रेवड्यांच्या खेळातच रममाण झाली आहेत. त्यामुळे ही निवडणूक एका अर्थाने रेवडी उत्सव ठरू शकेल, असे म्हणता येईल असे गिरीश कुबेर म्हणाले.
