Assembly Election Results 2026 : पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी राज्यातील विधानसभेचे निकाल स्पष्ट झाले आहेत. भाजपाचा पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये मोठा विजय झाला आहे. तर तमिळनाडूमध्ये द्रमुकची सत्ता जाऊन अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची तर केरळमध्ये डाव्यांची सत्ता जाऊन काँग्रेसप्रणीत आघाडीची सत्ता आली आहे. तसंच, पुद्दुचेरी येथे सत्ताधारी ऑल इंडिया एनआर काँग्रेसने विजय मिळवला आहे.
केरळमध्ये काँग्रेसचा विजय
इतर राज्यांमध्ये फारसी समाधानकारक कामगिरी करु न शकणारा काँग्रेस केरळमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. १४० विधानसभा जागांच्या या राज्यात काँग्रेसने ६३ जागा जिंकल्या आहेत.तर, सीपीआयएमला २६ जागा मिळाल्या असून आययुएमएलने २२ जागा जिंकल्या आहेत. सीपीआयला ८ तर, केईसीला ७ जागा मिळाल्या आहेत.

पुद्दुचेरीत एनडीएची मुसंडी
पुद्दुचेरीमध्ये एनडीए आघाडीने विजय मिळवला आहे. सत्ताधारी ऑल इंडिया एनआर काँग्रेस (एआयएनआरसी) १२ जागांवर विजय मिळवला असून डीएमकेने ५, भाजपाने ४, आघाडीवर असून, त्यापैकी १० जागा जिंकल्या आहेत. तर, भाजपाने चार जागी आघाडी घेतली पैकी तीन जागा जिंकल्या आहेत. आयएनडीने ३ आणि टीव्हीकेने २ जागा मिळवल्या आहेत.

आसाममध्ये भाजपाने सत्ता राखली
आसाममध्ये भाजपाने सत्ता राखली असून भाजपाला ८२ जागा मिळाल्या आहेत. तर, काँग्रेस १९, बीओपीएफ १०, एजीपी १० आणि एआययुडीएफला २ जागा मिळाल्या आहेत.

तमिळनाडूमध्ये टीव्हीकेचा मोठा विजय
तमिळनाडूमध्ये द्रमुकची सत्ता जाऊन अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची सत्ता आली आहे. टीव्हीकेने १०८ जागा मिळवल्या असून डीएमकेने ५९ जागांवर विजय मिळवला आहे. एडीएमकेने ४७ जागा मिळवल्या असून काँग्रेसला ५ तर पीएमकेला ४ जागा मिळाल्या आहेत. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये पश्चिम बंगालच लक्षवेधी ठरले नाही तर, तमिळनाडूमध्ये अभिनेता विजय यांच्या ‘टीव्हीके’ पक्षाने पदार्पणातच सत्ता काबीज केली आहे. वर्षानुवर्षे ब्लॉकबस्टर तमिळ चित्रपट देणारे विजय थेट मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्याची दाट शक्यता दिसू लागली असून तसे झाले तर ते तमिळनाडूचे ‘एनटीआर’ ठरतील. द्रविडी अस्मितेच्या जीवावर आलटून पालटून सत्ता मिळवणारे द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन्ही पक्षांवर मात करून ‘टीव्हीके’ने जबरदस्त धक्का दिला आहे.

पश्चिम बंगालमध्ये १५ वर्षांची तृणमूलची सत्ता संपुष्टात
पश्चिम बंगालमध्ये भाजपाने परिवर्तन घडवून आणले आहे. भाजपाला २०५ जागा मिळाल्या असून एका जागेवर आघाडीवर आहे. तृणमूल काँग्रेसला ७७ जागा, तर काँग्रेसला २ आणि एजेयुपी २ आणि सीपीआयएमला १ जागा मिळाली आहे. तृणमूलच्या अद्यापही ४ जागा आघाडीवर आहेत.

दोन मुख्यमंत्री पराभूत
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या भवानीपूर मतदारसंघातून पराभूत झाल्या. सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचा १५,१०५ मतांनी पराभव केला. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलीन कोळाथूरमध्ये टीव्हीकेच्या व्ही.एस.बाबू यांच्याकडून पराभूत झाले.
![Assembly Election Results 2026 winners list | BJP victory in West Bengal and Assam | पाच राज्यांचा विधानसभा निवडणूक निकाल २०२६ | तामिळनाडूमध्ये अभिनेता विजयचा विजय]\ Assembly Election Results 2026 winners list | BJP victory in West Bengal and Assam | पाच राज्यांचा विधानसभा निवडणूक निकाल २०२६ | तामिळनाडूमध्ये अभिनेता विजयचा विजय]\](https://images.loksattaimg.com/2026/05/assembly-election-results-2026-five-states-winner-list-bjp-tvk-udf.jpg?w=1024)