आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू या चार राज्यांतील तर पुद्दुचेरी या केंद्र शासित प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर भाजपाने मोठी मुसंडी मारली. परंतु, १० वाजून ४५ मिनिटाला निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भाजपा व तृणमूल काँग्रेसमधील मतांमध्ये फारसा फरक नव्हता. चार ते पाच टक्क्यांचा फरक होता. निकालाचा कल कायम राहिल्यास ममता बॅनर्जींचा पश्चिम बंगाल गड भाजपाकडे जाईल, तर आसाममध्ये भाजपाला पुन्हा एकदा सत्ता मिळत असल्याचे दिसून येत आहे. पश्चिम बंगालमध्ये बदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

तमिळनाडूतील सत्ताधारी पक्ष असलेल्या डीएमकेने भाजपावर मागील काही महिन्यांत जोरदार टीका केली होती. डीएमके पक्षाला तमिळनाडूत मोठा झटका बसला आहे. अभिनय क्षेत्रातून राजकारणात आलेले थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने तमिळनाडूत मुसंडी मारली आहे. त्यांचा पक्ष तमिळनाडूतील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला आहे. एम.जी. रामचंद्रन, जे. जयललिता यांच्या पाऊलांवर पाऊल ठेवत विजय हे सिनेक्षेत्रातून राजकारणात दाखल झाले. एम. करूणानिधी हे देखील सिनेमाची स्क्रिप्ट लिहित असत. पुद्दुचेरीत भाजपा प्रणित एनडीए सत्तेत पुन्हा येण्याच्या मार्गावर आहे.

केरळ हा देशातील माकपचा शेवटचा गड होता. परंतु, तोही ढासळल्याचे चिन्ह दिसत आहे. केरळमध्ये काँग्रेस प्रणित यूडीएफला सत्ता मिळताना दिसत आहे. तर सत्ताधारी एलडीएफ बहुमतापासून अद्याप दूर आहे. एकेकाळी पश्चिम बंगाल व त्रिपुरात माकपची सत्ता होती. ती संपुष्टात आली. आता केरळमध्ये देखील माकपची सत्ता संपुष्टात आली आहे. माकपला शेवटचे राज्य देखील गमवावे लागले आहे.

लोकसभा व राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी भाजपा सरकारने १३१ व्या घटनादुरूस्तीचे विधेयक संसदेत मांडले होते. लोकसभेच्या जागा वाढवण्याचा भाजपा सरकारचा विचार होता. त्याला तमिळनाडूतील डीएमके पक्षाने कडाडून विरोध केला होता. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात डीएमकेने हा मुद्दा लावून धरला होता. मतदारसंघांची पुनर्रचना करून भाजपा त्यांच्या सोईने मतदारसंघांची पुनर्रचना करेल, अशी शंका डीएमके तसेच इतर विरोधी पक्षांनी व्यक्त केली होती. हा मुद्दा तामिळनाडूच्या राजकारणात चालला नसल्याचे दिसून येते.

या निवडणुकीत भाजपाने आसामवरील पकड आणखी घट्ट केल्याचे दिसून येत आहे. आसामसह पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे सरकार अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये भाजपा मजबूत स्थितीत आहे. २०२४ मध्ये भाजपाने ओडिशा विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करत सरकार स्थापन केले होते. यावेळी पश्चिम बंगालमध्ये भाजपा सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. त्रिपुरा तसेच ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये भाजपा मित्रपक्षांबरोबर सत्तेत सहभागी आहे. ईशान्य भारतासाठी भाजपाने नॉर्थ – इस्टर्न डेमोक्रेटिक अलायन्स तयार केले आहे.