पाच वर्षांपूर्वी बस्तरमुळे बहुमताचा आकडा गाठणाऱ्या भाजपला या वेळी रायपूर विभागाने मदतीचा हात दिला आणि मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह यांचा तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा झाला. सत्ताधाऱ्यांविरोधात वातावरण आणि नक्षली हल्ल्यात बळी पडलेल्या ज्येष्ठ नेत्यांबद्दल सहानुभूतीचे वातावरण असूनही काँग्रेसला या वेळी योग्य नेतृत्वाअभावी सत्ता हस्तगत करण्यात अपयश आले.
आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत छत्तीसगडमधील सत्तेची चावी कुणाकडे, या विषयीचा सतत संभ्रम होता. कधी भाजप तर कधी काँग्रेस, असा बहुमताचा आकडा झुकत राहिला. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास भाजपने ९० पैकी ५१ मतदारसंघात घेतलेली आघाडी कायम राहिल्याने व त्यातील २५ जागा जिंकल्याने हाच पक्ष बहुमताच्या जवळ जाईल, यावर शिक्कामोर्तब झाले. याच वेळी काँग्रेसच्या जागांचा आकडा ३८ वर स्थिरावलेला दिसला. अखेर सायंकाळी उशिरा निकाल स्पष्ट झाला, भाजपने ९० पैकी ४८ जागा मिळवीत विधानसभेवर निर्विवाद वर्चस्व मिळविले,  तर काँग्रेस ४२ जागा मिळवित दुसऱ्या स्थानावर फेकली गेली़  बसपा व इतर पक्षांना एकही जागा मिळविता आली नाही़
भाजपसाठी यावेळची निवडणूक अजिबात सोपी नव्हती. सलग दहा वर्षे सत्तेत राहिल्याने जनतेत नाराजी होती. रमणसिंहांच्या मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होते. या राज्यात ३० टक्के आदिवासी व तेवढेच साहू समाजाचे मतदार असताना भाजपच्या मंत्रिमंडळात मात्र व्यापाऱ्यांचा भरणा जास्त होता.
या पाश्र्वभूमीवर काँग्रेससाठी प्रथमच अनुकूल वातावरण होते. मात्र, त्याचा फायदा उचलण्यात या पक्षाला यश आले नाही. नंदकुमार पटेल व महेंद्र कर्मा जिवंत असते तर चित्र वेगळे राहिले असते. तरीही नक्षली हल्ल्यात बळी पडलेल्या महेंद्र यांच्या पत्नी देवती कर्मा यांना मात्र जनतेच्या सहानुभूतीचा पूर्ण लाभ मिळाला़  त्यांनी दंतेवाडामध्ये भाजपच्या भीमा मांडवी यांचा तब्बल सहा हजार मतांनी दणदणीत पराभव केला़  नंदकुमार पटेल यांचा पुत्र उमेश पटेल यांनीही रायगढ खर्सिया मतदारसंघातून भाजपच्या जवाहरलाल नायक यांच्याविरोधात मोठी आघाडी घेतली होती़  दर्भामधील नक्षली हल्ल्यातून बचावलेले काँग्रेसचे आमदार कवासी लख्मा यांनीही कोंटा भागातून आघाडी घेतली होती़  तसेच बसपच्या दोन उमेदवारांनीही येथील दोन जागांवर आघाडी घेतली होती़
काँग्रेसने अजित जोगींना बाजूला सारून कुणालाही समोर न करता ही निवडणूक लढवली. त्यामुळे अनुकूल वातावरण असूनही त्याचे विजयात रूपांतर करण्यात या पक्षाला अपयश आले. भाजपने ही निवडणूक पूर्णपणे डॉ. रमणसिंग यांच्या नेतृत्वाखाली लढवली. त्यांनी कोणत्याही मंत्र्यांना सोबत न घेता प्रचारात आघाडी घेतली. नेमके हेच डावपेच यशस्वी ठरले. प्रस्थापित विरोधी लाटेमुळे भाजपच्या तीन मंत्र्यांना, तसेच विधानसभेच्या अध्यक्षांना पराभूत व्हावे लागले. काही वर्षांपूर्वी या राज्यात दिलीप साहू यांनी स्थापन केलेल्या छत्तीसगड स्वाभिमानी मंचनेही यावेळी बरीच मते खेचून भाजपच्या नाकी नऊ आणले. नेहमी भाजपला मतदान करणाऱ्या साहू समाजाच्या मतांची विभागणी या मंचमुळे झाली. प्रचाराच्या काळातही या राज्यात भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या सभांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मोदींच्या तुलनेत सोनिया व राहुल गांधी यांच्या सभा मोठय़ा झाल्या. आताचे निकाल पाहू जाता मोदी फॅक्टरचा या राज्यात प्रभाव पडू शकला नाही, हे स्पष्ट झाले आहे. केवळ रमणसिंगांनी एकटय़ाच्या बळावर हा आकडा गाठला आह़े
छत्तीसगड
*काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित जोगी यांचे पुत्र अमित यांनी मारवाही मतदारसंघात भाजपचे उमेदवार समीरा पाईक्रा यांचा ४६ हजार २५० मतांनी दणदणीत पराभव केला़
*नक्षली हल्ल्यात बळी पडलेल्या महेंद्र यांच्या पत्नी देवती कर्मा यांनी दंतेवाडामध्ये भाजपच्या भीमा मांडवी यांच्यावर तब्बल सहा हजार मतांनी दणदणीत विजय मिळविला़
*छत्तीसगढच्या विद्यमान गृहमंत्र्यांसह पाच मंत्र्यांना या निवडणुकीत धूळ चारण्यात आली आह़े  गृहमंत्री नानकिरम कन्वार, विधानसभेचे उपसभापती नारायण चंडेल यांना आपला मतदार संघ राखता आलेला नाही़  तसेच कृषी चंद्रशेखर साहू, जलस्रोत मंत्री रामविचार नेतम आणि क्रीडा मंत्री लता उसेंदी यांनाही काँग्रेसच्या उमेदवारांकडून पराभवाचा धक्का बसला आह़े
एकूण जागा ९०
          २०१३    २००८    
भाजप     ४८     ५०
काँग्रेस     ४२     ३८
इतर        ००     ०२    
अपक्ष        ००    ००
नयन ‘रमण’ विजय
जनसंघपासूनचे कार्यकर्ते असणारे छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी या विधानसभा निवडणुकांत पुन्हा दणदणीत विजय साकारला आह़े  राजनंदगाव या त्यांच्या मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार अलका मुदलीयार यांचा ३५ हजार ८६६ मतांनी पराभव केला आह़े  ६१ वर्षीय रमण सिंग २००३ पासून छत्तीसगढचे मुख्यमंत्री आहेत़  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आणि जनसंघचे युवा कार्यकर्ते तसेच १९७६-७७ साली कावार्धा युवा विभागाचे अध्यक्ष अशी त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली़  त्यानंतर १९८३ साली त्यांनी कावार्धा महापालिकेत ते नगरसेवक म्हणून निवडून गेल़े  नगरसेवक पदापासून सुरू झालेला त्यांचा सत्ताकारणाचा आलेख सातत्याने उंचावता राहिला आह़े  १९९० आणि १९९३ मध्ये ते मध्य प्रदेश विधानसभेवर निवडून गेल़े  त्यानंतर लगेचच १९९९ साली रमण १३ व्या लोकसभेवर छत्तीसगढमधील राजनंदगाव मतदारसंघातून निवडून गेल़े  त्याच वेळी वाजपेयी शासनाच्या काळात ते १९९९ ते २००३ या दरम्यान केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री पदावर विराजमान झाले होत़े  पक्षांतर्गतही रमण यांच्यावर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या़.
लखमा यांची आघाडी कायम
सलवा जुडूम या नक्षलविरोधी मोहिमेचे प्रणेते महेंद्र कर्मा यांच्या पत्नी देवती कर्मा यांनी दांतेवाडा मतदारसंघात विजयपताका रोवली असून, चालू वर्षी मे महिन्यात दर्भा येथे करण्यात आलेल्या हल्ल्यातून बचावलेले काँग्रेसचे एकमेव आमदार कवासी लखमा यांनी कोंता मतदारसंघात आपली आघाडी कायम राखली. रमणसिंग यांच्या मंत्रींडळातील कृषीमंत्री, पंचायत आणि ग्रामविकास मंत्री हे पराभवाच्या छायेत होते. त्यांच्याबरोबरच कोंडागाव आणि वारायणपूर मतदारसंघातही अनुक्रमे क्रीडामंत्री आणि आदिवासी विकास मंत्र्यांचा काँग्रेसच्या उमेदवाराकडून पराभव झाला.

“हा ऐतिहासिक दिवस आह़े  भाजपला सत्तेत येण्याची ‘हॅट्ट्रिक’ करू दिल्याबद्दल मी छत्तीसगढच्या जनतेचे आभार मानतो़  जनतेने विकासप्रधान कार्य आणि कल्याणकारी उपाय योजनांच्या बाजूने मतदान केले आह़े”
 रमणसिंह, मुख्यमंत्री, छत्तीसगढ
“छत्तीसगढ मधील पराभव आम्ही पूर्ण नम्रतेने स्वीकारतो आहोत़.”
अजित जोगी,  कॉंग्रेसचे छत्तीसगढमधील जेष्ठ नेते