तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देत थलपती विजयने विजयी घोडदौड करत १०५ जागांवर आघाडी घेतली आहे. पहिल्यांदा निवडणूक लढवणाऱ्या विजयच्या पक्षाने क्रमांक एकचा पक्ष म्हणून तमिळनाडूत स्थान मिळवलं आहे. दरम्यान विजय तमिळनाडूचे मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे. काही आमदारांची गरज त्यांना लागणार आहे. त्यात नेमकं काय होतं? हे पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान ज्योतिषी विक्रम चंदीरामानी यांनी विजय यांचा भलामोठा विजय, त्याचप्रमाणे पुढील वाटचाल कशी असेल? यावर भाष्य केलं आहे.
काय म्हटलंय विक्रम चंदीरामानी यांनी?
मी हे मत नोंदवत आहे तेव्हा विजयचा TVK हा पक्ष १०५ जागांवर आघाडीवर आहे. तेदेखील अशा राज्यात ज्या तमिळनाडूमध्ये गेली ४० वर्षे डीएमके आणि एआयडीएमके अशा दोन पक्षांमध्ये सत्ता होती. विजयचा हा विजय म्हणजे एका मोठ्या बदलाची नांदी आहे. तमिळनाडूच्या जनतेने फक्त मतदान केलं नाही तर खऱ्या अर्थाने त्यांचं भविष्य मतपेटीत बंद केलं हे दाखवणारा हा निकाल ठरला आहे. विजय तमिळनाडूत इतका मोठा करीश्मा करु शकेल आणि असा बदल घडवून आणेल हे कुणालाही वाटलं नव्हतं. माध्यमांनीही त्याला गांभीर्याने घेतलं नाही ही वस्तुस्थिती आहे. उलट तो चित्रपटांमध्ये मोठी कारकीर्द करेल असेच अंदाज सगळ्यांनी वर्तवले होते. त्या सगळ्या अंदाजांना छेद देऊन विजयने हा विजय खेचून आणला आहे.
मी मार्चमध्येच सांगितल होतं की विजय मुख्यमंत्री होणार-चंदीरामानी
मार्च २०२६ मध्ये ‘द वीक’ ने माझ्यासह इतर अनेक ज्योतिषांकडे तमिळनाडूमध्ये काय राजकीय शक्यता असतील? याबाबत मत मागितलं होतं. मी त्यावेळीही म्हटलं होतं की विजयला गांभीर्याने घेतलं जात नाहीये. मी त्यावेळी हे भाकित केलं होतं की विजय हा एका पक्षाचा आधार घेऊन तमिळनाडूचा पुढचा मुख्यमंत्री होईल. तसंच त्याची राजकीय कारकीर्द प्रदीर्घ असणार आहे हा अंदाजही मी वर्तवला होता. त्यावेळी माझं हे म्हणणं अनेकांना पटलं नव्हतं. पण जो घटनाक्रम घडला आणि निकालाच्या दिवशी जी गोष्ट समोर आली त्यातून हे स्पष्ट आहे की विजय तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार.

विजयची कुंडली काय सांगते?
विजयची रास कर्क आहे. ज्याचा कारक चंद्र आहे. ही बाब वरवर पाहता साधी सरळ वाटते पण ती तशी नाही. जनतेशी असणारं भावनिक नातं हे चंद्र दर्शवतो आहे. पत्रिकेत असा योग असलेला माणूस लोकांशी थेट संवाद साधतो. असे लोक थेट जनतेच्या मनात शिरुन अधिराज्य करतात. जनता असा योग असलेल्या लोकांना आपलंसं मानते, त्यांना आपल्या हृदयाच्या जवळचं स्थान देते. राजकारणात ही एक मोठी ताकद मानली जाते. लोकांना तुम्ही आपले वाटणं महत्त्वाचं ठरतं.
संवादासाठी कारक असलेली ग्रहस्थिती विजयच्या पत्रिकेत आहे
विजयच्या पत्रिकेत सूर्य आणि बुध हे दोन्ही मिथुन राशीमध्ये आहेत. संवादासाठी उत्तम कारक अशी ही ग्रहस्थिती आहे. असा योग पत्रिकेत असलेले लोक कलाकार, राजकीय नेते होतात. मिथुन रास ही त्यांना ती व्यापकता प्रदान करते. त्यामुळे असे लोक विविध प्रकारच्या स्वभावाच्या लोकांशी सहज संवाद करु शकतात, अगदी सहज जोडलेही जातात. तसंच अशा व्यक्ती या आपलं म्हणणं ठामपणे मांडतात आणि आपला अंदाज बदलण्याची क्षमताही ठेवतात. मीडियामुळे आपली प्रतिमा बदलून जाईल का? याची चिंता त्यांना सतावत नाही. कारण असे लोक बहुमुखी प्रतिभेचे असतात अशीही माहिती ज्योतिषी विक्रम चंदीरामानी यांनी दिली.

विजयला सुरु आहे शुक्राची महादशा
विजयच्या पत्रिकेतला शुक्रही बलस्थानी आहे. त्यामुळे सिनेमाप्रती असलेलं विजयचं आकर्षण हे का आहे ते लक्षात येतं. तसंच बलस्थानात शुक्र असणं हे स्थिर, प्रामाणिक आणि भक्तिमय व्यक्ती असल्याचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. तसंच असा योग असलेल्या व्यक्ती आकर्षक असतात. लोकांचं लक्ष त्या सहजपणे वेधून घेतात.विजयला सध्या शुक्राची महादशा सुरु आहे तर त्याला सुरु असलेली अंतर्दशा ही राहुची आहे. हा एक असा संकेत आहे ज्यात महत्त्वाकांक्षा वाढलेली असते. शुक्र जनताला आकृष्ट करतो तर राहु व्यापक स्तरावर अशा व्यक्तीला नेण्याचं काम करतो. विजयच्या पत्रिकेत हा योग अतिशय उत्तम आहे. एका अभिनेत्याचं राजकारणात येणं आणि पहिल्याच निवडणुकीत इतकं घवघवीत यश मिळवणं या दोन्ही गोष्टी या शुक्राच्या महादशेमुळे आणि राहुच्या अंतर्दशेमुळे घडल्या आहेत अशीही माहिती चंदीरामानी यांनी दिली.
