Bangladesh Crisis Prediction : बांगलादेशमध्ये आरक्षणाविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाने रौद्र रूप घेतले आहे. या हिंसाचारात आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे. देशातील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. तसेच संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. एकंदरितच गंभीर स्थिती बघता पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन बांगलादेशमधून पलायन केलं असून त्यांनी भारतात आश्रय घेतला आहे. बांगलादेशमधील या परिस्थितीनंतर आता सोशल मीडियावरील वर्षभरापूर्वीची एक पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. प्रसिद्ध ज्योतिषी प्रशांत किनी यांची ही पोस्ट आहे. ही पोस्ट १४ डिसेंबर २०२३ रोजी करण्यात आली होती. या पोस्टमध्ये प्रशांत किनी यांनी २०२४ च्या मे, जून, जुलै किंवा ऑगस्ट या महिन्यात बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या हत्येचा प्रयत्न होऊ शकतो, असं भाकीत वर्तवलं होतं. या पोस्टची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे. हेही वाचा - बांगलादेशचे माजी मंत्री विमानतळ प्राधिकरणाच्या ताब्यात, विमान प्रवासापासून रोखले बांगलादेशामध्ये सद्यस्थिती काय? बांगलादेशमध्ये चालू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत १०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. आंदोलकांनी शेख हसीना ( Sheikh Hasina ) यांचं कार्यालयही जाळलं आहे. तसेच त्यांच्या घरातही वस्तूही अस्तव्यस्त करण्यात आल्या आहेत. याशिवाय बांगलादेशमधील हिंदू मंदिरांनाही लक्ष्य करण्यात आलं आहे. आंदोलकांनी प्रसिद्ध इस्कॉन मंदिरांचीही तोडफोड केली आहे. शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला असून देश सोडल्यानंतर त्यांनी भारतात आश्रय घेतला आहे. तसेच बांगलादेशच्या लष्कराने प्रशासनावर तात्पुरता ताबा घेतला आहे. सौजन्य - सोशल मीडिया शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर बांगलादेश संसद मंगळवारी विसर्जित करण्यात आली आहे. बांगलादेशमध्ये लवकरच अंतरिम सरकार स्थापन करण्यात येणार असून नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस हे त्या सरकारचे मुख्य सल्लागार बनण्याची शक्यता आहे. हेही वाचा - १५ वर्षांची सत्ता ४५ मिनिटांत कशी गेली? शेख हसीना यांच्या निवासस्थानी नाट्यमय घडामोडी; दिशाहीन झुंडीचा नेमका परिणाम काय? परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी सादर केले निवेदन दरम्यान, बांगलादेशमधील परिस्थितीबाबत परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी राज्यसभेत निवेदन सादर केलं आहे. डॉ.एस.जयशंकर म्हणाले, “बांगलादेशमध्ये जुलै महिन्यांपासून हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. तेथील आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला होता. मात्र, त्यानंतरही त्या ठिकाणी हिंसाचाराच्या घटना सुरू होत्या. बांगलादेशातील आंदोलनकर्त्यांना शेख हसीना यांना हटवायचं होतं. त्या पार्श्वभूमीवर अशा प्रकराच्या घटना तेथे सुरु होत्या. हिंसाचाराच्या घटना वाढल्यानंतर ५ ऑगस्ट रोजी शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर बांगलादेश सोडताना त्यांनी भारतात येण्यासाठी विनंती केली होती”, अशी माहिती एस.जयशंकर यांनी संसदेत बोलताना दिली.