पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या लाहोरमधील घरी गेले, त्यावेळी नवाज यांच्या नातीचा लग्नसोहळा सुरु होता. मोदींनी लग्नघरातील मंडळींसाठी भेट वस्तू आणल्या होत्या. परंतु, नवाज शरीफ यांच्यासाठी मोदींनी कोणती भेटवस्तू नेली होती हे आतापर्यंत गुलदस्त्यात होते. आता हे गुपित उघडले आहे. ‘पीटीआय’ने एक छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. शरीफ यांनी डोक्यावर गुलाबी रंगाचा फेटा परिधान केल्याचे या छायाचित्रात पाहायला मिळते. नरेंद्र मोदी यांनी हा फेटा नवाज शरीफ यांना भेट दिला होता. नवाज शरीफ यांनी हा राजस्थानी फेटा नातीच्या लग्नाच्या भोजन समारंभावेळी घातला होता. नवाज यांनी मोदींच्या भेट वस्तूचा मान ठेवला असून, पाकिस्तानचे पंतप्रधान शेजारील रा‌ष्ट्रांबरोबर चांगले संबंध कायम ठेवण्यासाठी गंभीर असल्याचे, मोदींनी दिलेला फेटा नवाज यांनी आपल्या डोक्यावर सजवल्याने प्रतीत होत असल्याची भावना नवाज शरीफ यांच्या ‘पाकिस्‍तान मुस्लिम लीग-एन’ पक्षाच्या नेत्याने व्यक्त केली.

शरीफ यांच्या पत्नीला मोदींकडून शाल भेट
पंतप्रधान मोदी शुक्रवारी ‘सरप्राइज विझिट’ देत लाहोरमध्ये जवळजवळ दोन तास चाळीस मिनिटे थांबले होते. पाकिस्तानचे पंतप्रधान नवीज शरीफ यांच्या घरी जाताना त्यांनी आपल्याबरोबर अनेक भेटवस्तू नेल्या होत्या. मोदींनी नवाज यांची नात मेहरुनिसाला पारंपरिक भारतीय पोशाख, तर पत्नी कलसुम यांना एक शाल भेट म्हणून दिली. पंतप्रधान शरीफ यांनी मोदींची आपल्या आईशी भेट घालून देताच मोदींनी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. या अगोदर मोदींच्या शपथग्रहण सोहळ्याला उपस्थित असलेल्या शरीफ यांनी मोदींच्या आईला साडी भेट दिली होती.

मोदींसाठी साजूक तुपातील शाकाहारी व्यंजन
नवाज शरीफ यांच्या घरी मोदींसाठी साजूक तुपातील शाकाहारी व्यंजनाचा बेत आखण्यात आला होता. ‘लंच-कम-डिनर’मध्ये जेवणात भाजी, आमटी आणि शाकाहारी पदार्थ होते. सर्व पदार्थ साजूक तुपात तयार करण्यात आले होते. त्यांना काश्मिरी चहादेखील देण्यात आला. मोदींच्या स्वागतात कोणतीही कमतरता राहू नये, म्हणून नवाज शरीफ यांचा मुलगा हसन आणि कुटुंबीय जातीने लक्ष घालत होते.