चेन्नई : तमिळनाडूत गुरुवारीही मुसळधार पावसापासून दिलासा मिळालेला नाही. चेन्नईसह अनेक शहरांमध्ये संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. राज्यात मुसळधार पावसामुळे आतापर्यंत १४ जणांचा बळी गेला आहे.

चेन्नईव्यतिरिक्त चेंगलपेट, तिरुवल्लूर, कांचीपुरम आणि विल्लुपुरममध्येही मुसळधार पाऊस सुरू आहे. या भागात आणखी मुसळधार पावसाची शक्यता आहे. शिवाय जोरदार वाऱ्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबामुळे राज्यात पुढील किमान दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. गुरुवारी संध्याकाळपर्यंत ते उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. तमिळनाडूतील पावसाचा सामना करण्यासाठी सरकारने राष्ट्रीय आपत्ती निवारण दल ‘एनडीआरएफ’ची एक टीमही तैनात केली आहे.

पावसाशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत १५७ गुरांचा मृत्यू झाला आहे, १,१४६  झोपडय़ा आणि २३७ घरे बाधित झाली आहेत.

पाणी साचल्यामुळे, उपनगरीय रेल्वे सेवा चेन्नई सेंट्रल आणि तिरुवल्लूर दरम्यान बंद ठेवण्यात आली होती.

चेन्नईमध्ये विमानसेवा स्थगित

मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे चेन्नई येथे विमानांचे आगमन संध्याकाळपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. तर विमान उड्डाणे मात्र सुरू राहतील असे निर्गमन सुरू राहील, असे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन दुपारी सव्वा वाजल्यापासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत विमानांचे आगमन रद्द करण्यात आले आहे, असे ट्वीट चेन्नई विमानतळाने केले आहे. तर प्रवाशांनी वेळापत्रकासंबंधित अद्ययावत माहितीसाठी संबंधित हवाई कंपन्यांशी संपर्क करण्याचे आवाहन विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.