नायजेरियातील मैदुगुरी शहरात एका मशिदीत सकाळची प्रार्थना सुरू असताना दोन महिला आत्मघातकी हल्लेखोरांनी घडविलेल्या बॉम्बस्फोटात २२ भाविक ठार झाल्याचे मदतकार्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
दोघा आत्मघातकी हल्लेखोरांपैकी एकीने मशिदीच्या आतमध्ये स्फोट घडविला. या हल्ल्यातून बचावलेल्या भाविकांची प्रतीक्षा करीत दुसरी हल्लेखोर मशिदीबाहेर थांबली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या हल्ल्यात किमान १७ जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेचे अधिकारी अब्दुल मोहम्मद यांनी सांगितले. या हल्ल्यातून बचावलेल्या उमर उस्मान यांनी सांगितले की,मशिदीपासून काही अंतरावर असताना अचानक स्फोटाचा कानठळ्या बसविणारा आवाज ऐकू आला आणि धुराचे लोळ येताना दिसले. त्यानंतर ठार झालेल्या भाविकांचे मृतदेहही दिसले, असे उस्मान यांनी सांगितले. सदर मशीद बोको हराम या संघटनेचा बालेकिल्ला असलेल्या उमरारी येथे आहे. बोको हराम या दहशतवादी संघटनेशी लढण्यासाठी नायजेरियाच्या लष्कराचे मुख्य केंद्रही येथेच आहे.