उत्तराखंड व हिमाचल प्रदेशात जोरदार पावसामुळे किमान २६ जण मरण पावले. दरम्यान, उत्तर भारतात आद्र्रताही वाढली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंड व हिमाचल प्रदेश येथे झालेल्या प्राणहानीबाबत दु:ख व्यक्त केले आहे.
शनिवारी चारधाम यात्रा संपली व नेमके त्याचवेळी पागल नाला (बद्रीनाथ) बन्स बाडा ( केदारनाथ) निकाला, लालढांग, सुसखी टॅप व गरमपाणी ( गंगोत्री) सिलाय बांध, नारायण व हनुमान छट्टी ( यमुनोत्री) या सर्व ठिकाणी चार मंदिरांकडे जाणारे रस्ते बंद झाले.
 डेहराडून येथे १२० मि.मी पाऊस झाला असून रिस्पाना, बिंदाल व जाखन नद्यांना पूर आले आहेत. हिमाचल प्रदेशात पावसामुळे हमीरपूर व उना येथे जनजीवन विस्कळीत झाले. हमीरपूर येथे एकाच कुटुंबातील चार जण कुहाना नदीच्या प्रवाहात वाहून गेले, एक जण दरड कोसळून मरण पावला.  किमान २०० रस्ते पाऊस व दरडी कोसळण्याने बंद राहिले. उन्ना जिल्ह्य़ात बंगाना येथे १६० मि.मी पाऊस झाला. उत्तराखंडमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस कोसळत असून त्यामुळे तीन घरांवर दरडी कोसळून झालेल्या अपघातात  सात जण ठार झाले आहेत.
शहरातील काठबंगला परिसरात मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मुसळधार पावसामुळे दरडी कोसळल्या आणि त्या तीन घरांवर पडल्या, असे पोलिसांनी सांगितले.चिखल आणि दगडमातीच्या ढिगाऱ्याखालून सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. साखरझोपेत असतानाच काळाने या व्यक्तींवर घाला घातला. मुसळधार पावसामुळे पौरी, डेहराडून आणि पीठोरगड परिसरात शुक्रवारी झालेल्या दुर्घटनांमध्ये १७ जण ठार झाले.