10 dead in Canada school shooting : ब्रिटिश कोलंबियाच्या उत्तर भागातील एक शाळा आणि आजूबाजूच्या वस्तीत अंदाधूंद गोळीबार झाला असून यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शूटरचाही समावेश आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. गेल्या काही दशकांमधील सर्वात भीषण गोळीबार मानला जात आहे.
मंगळवारी झालेल्या या गोळीबारात शाळेत सहा जणांचा मृत्यू झाला, तर, एकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला, अशी माहिती कॅनेडियन पोलिसांनी सीबीसीला दिली. तर, दोन जणांचा त्यांच्या राहत्या घरीच मृत्यू झाला असून ते या घटनेशी संबंधितच होते. तसंच, ज्याने गोळीबार घडवून आणला, त्याचाही मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सखोल चौकशी केली जाईल, असं कॅनेडियन पोलिसांनी सांगितलं.
रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांच्या (आरसीएमपी) च्या निवेदनानुसार, मंगळवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी १:२० च्या सुमारास टम्बलर रिज माध्यमिक शाळेत गोळीबार झाल्याचे वृत्त पोलिसांना कळाले. त्यांनी तत्काळ प्रतिसाद देत घटनास्थळी धाव घेतली. तेथे त्यांना सहा लोक मृत आणि डझनभर जखमी आढळले. “आजच्या घटनांमध्ये इतर कोणी जखमी झाले आहे का किंवा त्याचा इतर कोणताही संबंध आहे का हे निश्चित करण्यासाठी अधिकारी परिसरात झडती घेत आहेत”, असं पोलिसांनी निवेदनात म्हटलं आहे.
गोळीबाराची घटना दुर्मिळ
टम्बलर रिज हे पश्चिम कॅनडातील रॉकी पर्वतांच्या पायथ्याशी, अमेरिकेच्या सीमेपासून सुमारे ६८० किलोमीटर (४२२ मैल) अंतरावर असलेले सुमारे २,४०० लोकसंख्येचे ग्रामीण शहर आहे. अमेरिकेपेक्षा खूपच कडक बंदुकींचे कायदे असलेल्या कॅनडामध्ये गोळीबाराच्या घटना अत्यंत दुर्मिळ आहेत. स्मॉल आर्म्स रिसर्च प्रोजेक्टनुसार , अमेरिकेत प्रत्येक १०० रहिवाशांमागे १२१ बंदुका आहेत, तर कॅनडात प्रत्येक १०० रहिवाशांमागे अंदाजे ३५ बंदुका आहेत. गोळीबार कशामुळे झाला याचा तपास पोलीस आता करत आहेत.
