scorecardresearch

जोशीमठमध्ये सध्या दोनच हॉटेल पाडणार; इतर घरांना तात्पुरता दिलासा

भूस्खलनामुळे असुरक्षित बनलेली जोशीमठमधील फक्त दोन हॉटेल पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जोशीमठमध्ये सध्या दोनच हॉटेल पाडणार; इतर घरांना तात्पुरता दिलासा

पीटीआय, जोशीमठ/ डेहराडून

भूस्खलनामुळे असुरक्षित बनलेली जोशीमठमधील फक्त दोन हॉटेल पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय राहण्यासाठी असुरक्षित घोषित केलेली कोणतीही घरे अद्याप पाडली जाणार नाहीत, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव आर. मीनाक्षी सुंदरम यांनी बुधवारी स्पष्ट केले.भूस्खलनग्रस्त जोशीमठचे समन्वयक अधिकारी सुंदरम यांनी जोशीमठ येथे पत्रकारांना सांगितले की, जोशीमठमधील भूस्खलनाने असुरक्षित झालेली फक्त दोन हॉटेल पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कारण ही हॉटेल परस्परांच्या शेजारीच आहेत. शेजारच्या इमारतींसाठी ते धोकादायक बनले आहेत. मात्र, याशिवाय अद्याप कोणतीही इमारत सध्या पाडली जात नाही.

‘माऊंट व्ह्यू’ आणि ‘मलारी इन’ ही शेजारी शेजारी असलेली हॉटेल भूस्खलनामुळे परस्परांकडे झुकली आहेत. ती पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घरे रिकामी करण्यासाठी लाल खुणा लावण्यात आल्या आहेत. ही हॉटेल पाडण्याची प्रक्रिया केव्हा सुरू होईल, असे विचारले असता, सुंदरम यांनी कोणतीही निश्चित कालमर्यादा सांगितली नाही. परंतु संबंधितांशी या संदर्भात पुन्हा एकदा चर्चा केली असून, ती सकारात्मक वातावरणात झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सुंदरम म्हणाले, की भूस्खलनामुळे बाधित इमारतींचे सर्वेक्षण केले जात आहे. असुरक्षित इमारतींतील रहिवाशांना तात्पुरते सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे. प्रत्येक बाधित कुटुंबाला दीड लाखांची अंतरिम मदत दिली जात आहे.

बाजारभावानुसार नुकसानभरपाई : मुख्यमंत्री धामी

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी बुधवारी जोशीमठ येथील भूस्खलनग्रस्तांना बाजारभावाने नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली. या दु:खद काळात सर्व बाधितांना सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही सांगितले. भूस्खलनग्रस्त घरे पाडण्याच्या अफवांकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले की, या संदर्भात कार्यवाही केली जात नाही. जोशीमठ नगरपालिका क्षेत्रातील भूस्खलनग्रस्तांना बाजारभावाने नुकसानभरपाई दिली जाईल व संबंधितांच्या सूचना विचारात घेऊन हा दर निश्चित केला जाईल.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-01-2023 at 03:46 IST

संबंधित बातम्या