पीटीआय, नवी दिल्ली राजधानी दिल्लीच्या जुन्या राजेंद्र नगर भागातील शिकवणी केंद्रात शनिवारी झालेल्या दुर्घटनेला नागरी संस्थाच जबाबदार असल्याची कबुली देत येथे गंभीर संरचनात्मक त्रूटी आहेत, त्यांकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे दिल्ली महानगरपालिकेचे (एमसीडी) अतिरिक्त आयुक्त तारिक थॉमस यांनी बुधवारी सांगितले. राजेंद्र नगर येथे आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधताना थॉमस म्हणाले, की ‘या घटनेला कोणतेही निमित्त असू शकत नाही. प्रशासनाने आपले कर्तव्य अधिक चांगल्या पद्धतीने बजावणे आवश्यक आहे.’ आपण म्हटल्याप्रमाणे यंत्रणेत संरचनात्मक त्रूटी आहेत, त्या पद्धतशीरपणे सोडवणे आवश्यक आहे, मी वैयक्तिकरित्या हे अपयश स्वीकारतो, अधिकारी म्हणून हे आमचे अपयश आहे. मी उघडपणे सांगत आहे, की हे घडायला नको होते, अशी कबुली थॉमस यांनी ‘राव आयएएस स्टडी सर्कल’बाहेर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी बोलताना सांगितले. या वेळी विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्नांचा भडिमार त्यांच्यावर केला. या घटनेत प्रशासनाच्या कामगिरीचे मूल्यमापन कोणत्या निकषावर करावे, असा प्रश्न आंदोलकांनी केला असता, थॉमस म्हणाले, की ‘घटनेची चौकशी सुरू आहे, घटनेला जबाबदार असलेल्यांवर कारवाई केली जाईल. मी मान्य करतो की आम्ही आमचे कर्तव्य अधिक चांगल्या प्रकारे बजावणे आवश्यक होते, परंतु ते घडले नाही. ‘राव’ आयएएस स्टडी सर्कलच्या तळघरात पुराचे पाणी शिरून यूपीएससीच्या परीक्षा देणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. यात दोन महिला आणि एक पुरुषाचा समावेश आहे. या घटनेच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. बुधवारी चौथ्या दिवशीही थॉमस यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. हेही वाचा >>>Shatrughan Sinha : “पंतप्रधान मोदी आता राहुल गांधींच्या…”, अनुराग ठाकूरांच्या ‘त्या’ विधानावरून शत्रुघ्न सिन्हा यांची टीका! आंदोलकांच्या १० प्रतिनिधींची समितीत नावे द्या : आतिशी शहरातील कोचिंग संस्थांचे नियमन करण्यासाठी कायद्याचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचा भाग म्हणून जुन्या राजेंद्र नगर येथील आंदोलक विद्यार्थ्यांना १० प्रतिनिधींची नावे देण्याच्या सूचना दिल्लीच्या शिक्षणमंत्री आतिशी यांनी बुधवारी केल्या. आतिशी यांनी बुधवारी आंदोलकांची भेट घेत त्यांच्या समस्यांसाठी सरकारच्या पाठिंब्याचे आश्वासन दिले. या वेळी त्यांच्याविरोधातही आंदोलकांनी घोषणाबाजी केली.